Saturday 5 May 2018

उभे आणि आडवे : जोडाक्षरे कशी लिहावीत?

देवनागरी लिपीत जोडाक्षरे लिहिण्याचे तीन प्रकार आहेत. आडवी जोडणी, उभी जोडणी आणि अक्षराचा पाय मोडून त्याचे अर्धेमुर्धेपण दाखवणे.
(शिवाय अनुस्वार - विशेषकरून तत्सम शब्दांच्या बाबतीत - अनुनासिकासह जोडून लिहिता येतो. ज्या अक्षराच्या आधी अनुस्वार लिहायचा, त्या अक्षराच्या वर्णमालेतल्या ओळीच्या शेवटचे अनुनासिक त्याला अर्धे करून जोडायचे. उदाहरणार्थ - कांचन - काञ्चन. (च-छ-ज-झ-ञ). टिळकांची ती सुप्रसिद्ध 'संत, सन्त आणि सन्+त' गोष्ट अनेकांना ठाऊक असते. तिच्यात हाच नियम वापरला आहे. या नियमामुळे बहुतांश अनुनासिकयुक्त जोडाक्षरे अनुस्वारासह लिहिता येतात. पण हे विषयांतर झाले.)
पाय मोडून लिहिणे सर्वाधिक सोपे. आडवी जोडणी त्याहून थोडी कठीण. तर उभी जोडणी अधिकच कठीण.
पाय मोडून लिहिताना कोणतेही अक्षर पूर्ण नाहीसे होत नाही. फक्त त्याच्या पायाशी दिलेल्या हलक्यासा तिरक्या चिन्हामुळे ते अर्धे असल्याचा बोध करून दिला जातो.

आडव्या जोडणीत अक्षरे एकमेकांत हलकी मिसळली गेल्याचा भास होतो. दोन माणसांनी एकमेकांना खेटून उभे राहावे आणि त्यामुळे त्यातल्या डावीकडल्या माणसाचा उजवीकडचा काही भाग दुसर्‍या माणसाआड जाऊन दिसेनासा व्हावा तशी ही जोडणी. जे अक्षर अर्धे, ते आधी लिहायचे आणि ते काहीसे अर्धेमुर्धे दिसते. सगळ्या जोडाक्षरांची आडवी जोडणी होतेच असे नाही. ही जोडणीही तशी वैशिष्ट्यपूर्णच. 
पण -

उभी जोडणी अधिक कठीण आणि अधिक वैशिष्ट्यपूर्ण. हिच्यात एका अक्षराने दुसर्‍या अक्षराला कडेवर वा डोक्यावर घेतले आहे असा भास होतो. जर त्या जोडाक्षराच्या वाचनाचा सराव वा जाणत्या माणसाचे मार्गदर्शन नसेल, तर कुठले अक्षर अर्धे व कुठले पूर्ण आहे, हे नीटसे कळणे जड जाते. सगळ्या जोडाक्षरांची उभी जोडणीही होतेच असे नाही.
या तीनही जोडण्यांखेरीज 'र'सारखी काही छळवादी अक्षरे अनेक निरनिराळ्या प्रकारे जोडली जातात (रफार, पापणीच्या केसासारखा अर्धगोलाकार, तिरकी रेष, छोटासा काकपदचिन्हासारखा त्रिकोण इत्यादी). क्ष (क् + ष), ज्ञ (ज् + ञ) ही जोडाक्षरे आहेत हे आपल्याला ठाऊकच नसते. श या अक्षराचा अर्धेपणा लिहायची मराठीतली पद्धत आपल्याला ठाऊक नसते. पण हे अपवाद. त्याबद्दल सरावाने ठाऊक होते. तोवर खाली काही जोडाक्षरांची फोड, आडवी जोडणी, उभी जोडणी आणि पाय मोडून लिहिणे यांची उदाहरणे दिली आहेत. हाती लिहून फोटो काढण्याचे कारण, सगळ्या कळफलकांत एकवाक्यता नसते. अर्थात हाती लिहिण्यात आणि छापील अक्षरांत आणि जोडाक्षरांतही फरक असतोच. पण त्याला तूर्तास इलाज नाही. (बाकी ल आणि श लिहिण्याच्या काही शासनमान्य, मग शासनबाह्य आणि पुन्हा शासनमान्य पद्धती आहेत. त्यांबद्दल पुन्हा कधीतरी.)
अशा तीनही प्रकारे जोडाक्षरे लिहिता येणे हे देवनागरीचे आणि पर्यायाने मराठीचे वैशिष्ट्य आहे. संगणकीय सोयींच्या नावाखाली त्याची गळचेपी होऊ नये. तंत्रज्ञांना आणि सर्वसामान्यांना या सगळ्या जोडण्या ठाऊक असतील, तर थोडे कष्ट घेऊन कळपाट बनवणारे आणि टंक बनवणारे लोकही या निरनिराळ्या पर्यायांचा समावेश करतील अशी आशा करत ही पोस्ट लोकहितार्थार्पण.  

***

तळटीप :
फेसबुकावर हे टिपण प्रसिद्ध झालं होतं. हा त्याचा दुवा.

No comments:

Post a Comment