Friday 11 May 2018

बोली आणि ग्रांथिक

फक्त औपचारिक वा पुस्तकी भाषेलाच लेखननियम असतात असं नव्हे; तर छापल्या वा लिहिल्या जाणार्‍या सगळ्या प्रकारच्या मजकुराला ते असतात. औपचारिक लेखनासाठीच्या नियमांहून वेगळे, मजकुराच्या प्रकृतीनुसार बदलणारे, क्वचित लेखनहेतूला अनुसरून अपवादांना जागा करून देणारे - पण नियम असतात. निरनिराळे नियम अनुसरणार्‍या लेखी भाषेचे दोन प्रकार पडतात - बोली आणि ग्रांथिक.

बोलीसाठीच्या लेखननियमांचा (!) विचार करताना ज्या गोष्टी जमेस धराव्या लागतात, त्या या टिपणात आहेत. त्या खालीलप्रमाणे -

मात्रा आणि शिरोबिंदू :
'आज माझे काहीच काम होत नाहीसे दिसते' आणि 'आज माझं काहीच काम होत नाहीसं दिसतं' या दोन्ही वाक्यांचा अर्थ एकच आहे. पण पहिलं वाक्य एकतर जुन्या वळणाचं वा पुस्तकी भाषेतलं, औपचारिक थाटाचं आहे. दुसरं मात्र उघडच अनौपचारिक आणि सध्या बोलण्याच्या पद्धतीला अनुसरून असलेल्या बोलीतलं आहे. हा फरक झाला आहे, तो मात्रांच्या जागी दिलेल्या शिरोबिंदूंमुळे. मात्रेच्या ऐवजी दिलं जाणारं, दीर्घ उच्चार दर्शवणारं, बोली भाषा सूचित करणारं, र्‍हस्व अक्षराच्या डोक्यावरचं टिंब म्हणजे शिरोबिंदू. तो अनुस्वार नव्हे. अनुस्वार आणि शिरोबिंदूत दर्शनी फरक काही नाही. तरीही संदर्भानं आपण अचूकपणे त्यांचे उच्चार वेगळाले करतो. शिरोबिंदूचा उच्चार अनुनासिक नसतो. त्या-त्या अक्षराचा उच्चार लांबवावा इतकंच सुचवण्यापुरता त्याचा अर्थ. शिरोबिंदू बहुतेकदा शब्दातल्या शेवटच्या अक्षरावर दिला जातो. पण कायम ते तसंच असेल, असं काही नाही. 'आज मला काहीच करावंसं वाटत नाही' या वाक्यात 'वं' हे अक्षर शब्दाच्या अखेरीस येत नसूनही शिरोबिंदू आला आहेच. ना. गो. कालेलकरांनी असा अंदाज वर्तवला आहे, की मात्रा असलेले जुनाट उच्चार फक्त लेखनात उरले असावेत आणि भाषा उत्क्रांत होताना बदलत गेलेल्या उच्चारांचं दर्शन या शिरोबिंदूतून होत असावं. असेलही. तूर्तास असं दिसतं, की बोलीमधल्या या शिरोबिंदुयुक्त मराठीचा वावर आता हळूहळू हातपाय पसरतो आहे आणि औपचारिक, सार्वजनिक, ग्रांथिक भाषा वापरण्याचा रिवाज असलेल्या ठिकाणीही बोली रुळू लागली आहे.

इडागम :
इडागम या प्रकरणाच्या तांत्रिक तपशिलांत न शिरता स्पष्टीकरण द्यायचं, तर धातूची रूपं करताना, हल्ली अनावश्यक वाटणारी एक वेलांटी देऊनही क्रियापदाची काही रूपं करता येतात. ही वेलांटी म्हणजे इडागम. 'तो सकाळपासून रात्रीपर्यंत काम करीत असे' आणि 'तो सकाळपासून रात्रीपर्यंत काम करत असे' यांत 'करत' आणि 'करीत' अशी दोन रूपं आहेत. दोन्हीचा अर्थ एकच आहे. पण वेलांटीसह असलेलं रूप जुनं आहे, तर वेलांटीशिवायचं नवीन. जुन्या रूपात जे घडतं, त्याला इडागम म्हणतात. तो एक वेळ ग्रांथिक मराठीत आला तर चालेल. पण बोली मराठीत? एखाद्या जुन्या वळणाच्या पंतोजींच्या तोंडी हे वाक्य घालायचं असेल, तर आणि तरच. एरवी नाही.

वे कृदन्त, स / ला / ते प्रत्यय आणि 'साठी' हे शब्दयोगी अव्यय :
'करण्यासाठी', 'करायला', 'करण्यास' आणि 'करावयास' या चार रूपांपैकी पहिली दोन्ही अगदी सध्याकालीन आहेत. तिसरं अजूनही ग्रांथिक मराठीत वापरलं जातं, पण बोली मराठीत नाही. चौथं तर अगदी आजोबाकालीन आहे. औपचारिक तर आहेच, पण जुनाटही आहे.

ने प्रत्ययाची रूपं :
'आईनं', 'आईनी' आणि 'आईने' ही तिन्ही रूपं बरोबरच. पण पहिली दोन्ही निरपवाद बोली, तर तिसरं ग्रांथिक.

'-तील' आणि '-तला' / '-तली' / '-तले' / '-तल्या':
'घरातील' आणि 'घरातल्या' काय बरोबर? तर दोन्ही बरोबरच. पण 'माझ्या घरातील माणसांना नीटनेटकेपणा अगदी खपत नाही!' आणि 'माझ्या घरातल्या माणसांना नीटनेटकेपणा अगदी खपत नाही!' यांतलं पहिलं वाक्य खास ग्रांथिक वा औपचारिक आहे. तर दुसरं नक्की बोली वा अनौपचारिक.

***

या सगळ्या घटकांच्या वापरामध्ये एकवाक्यता असावी, असा प्रयत्न मुद्रितशोधक करत असतो. म्हणजे -

'आईने मला काम करावयास / करण्यास सांगितले व मी ते करीत असतानाच माझ्या अंगातील कपडे घामाने भिजून मला बरे वाटेनासे झाले'

आणि

'आईनं / आईनी मला काम करायला सांगितलं आणि मी ते करत असतानाच  माझ्या अंगातले कपडे घामानं / घामानी भिजून मला बरं वाटेनासं झालं'

या दोन्ही वाक्यांत ग्रांथिक किंवा बोली, औपचारिक किंवा अनौपचारिक, जुनाट किंवा सध्याकालीन, सार्वजनिक किंवा खासगी अशी निवड एकाहून अधिक ठिकाणी केलेली आहे आणि एकदा ती केल्यावर पुढच्या निर्णयांतही तीच कायम राखलेली आहे. ('व' हे उभयान्वयी अव्यय ग्रांथिक, औपचारिक, सार्वजनिक, जुनाट अशांपैकी निवडीला जवळचं; तर 'आणि' (किंवा 'नि') हे उभयान्वयी अव्यय बोली, अनौपचारिक, खासगी, सध्याकालीन निवडीला जवळचं - हाही असाच एक संकेत. नियम नव्हे!)

या एकवाक्यतेच्या संकेतालाही अपवाद असणारच. पण ते त्या-त्या वेळी, संदर्भांनुसार, लेखकाच्या उद्देशांनुसार बदलतील, याचं भान बाळगणं आवश्यक. तूर्तास ही संकेतांची नोंद केवळ.

5 comments:

  1. सध्या हिंदी इंग्रजी जाहिरातींचे चे मराठी करणारे जुन्या पद्धतीची मराठी वापरतात. ते मुद्दाम करतात का चुकून हे कळत नाही मात्र मुलांवर त्याचा प्रभाव लक्षात येतो.

    ReplyDelete
    Replies
    1. हो? पुस्तकं वाचून करत असतील येडे!

      Delete
  2. सुरेख आणि सुस्पष्ट विवेचन .

    ReplyDelete