Friday 12 June 2020

शब्दांची जातिव्यवस्था : प्रकार पहिला

काही संज्ञा समजून घेतल्याशिवाय पुढे जाताना पावलोपावली अडखळायला होईल. म्हणून काही मूलभूत वर्गीकरणं आणि त्याला व्याकरणानं दिलेली नावं शिकून घेऊ.
शब्दांचेही प्रकार असतात. अगदी पाणबंद नसतात. एका प्रकारातला शब्द दुसर्‍याचं काम करू शकतो अधूनमधून गरजेनुसार. पण तरीही प्रकार राहतातच. या प्रकारांना शब्दांच्या जाती म्हणतात. त्यांतही पोटजाती असतात, पण त्यात तूर्त शिरायला नको. गरज पडेल तेव्हा बघता येईल.
१. नाम : कुठल्याही व्यक्तीला वा गटाला वा जागेला वा वस्तूला वा संकल्पनेला वा भावनेला वा गुणाला दिलेलं नाव. (उदा. मेघना, टेकडी बंगला, ठाणे, चाळेगत, पुस्तक, वापर, जागा, बाटली, यश, नैराश्य, चांगुलपणा, बक्षीस, उंदीर, चिंटू, घार.) मेघना किंवा चिंटू किंवा चाळेगत ही नामं आहेत हे चटकन स्वीकारलं जातं. पण नैराश्य किंवा बाटली ही नामं आहेत हे पचनी पडत नाही. समजा, आपण आदिमानव आहोत. अजून भाषा घडते आहे. एखाद्या संध्याकाळी एकदम रडू यायला लागलं, काही करू नये, गुहेत बसून राहावं असं वाटलं. आपल्याला काय होतंय, हे कुणाला सांगायचं म्हटलं. त्याला नाव द्यावं लागेल की नाही? त्या भावनेला दिलेलं नाव म्हणजे नैराश्य. तेच बाटलीचंही. ‘द गॉड्स मस्ट बी क्रेझी’सारख्या परिस्थितीत यापूर्वी कधीही न पाहिलेली काचेची बाटली समोर आली. त्या वस्तूला काहीतरी नाव द्यावंसं वाटलं. ते नाव म्हणजे ‘बाटली’ हे नाम.
२. सर्वनाम: नामाच्या ऐवजी वापरण्याचे शब्द (उदा. मी, आम्ही, तू, तुम्ही, तो, ती, ते, ते, त्या, आपण.) नाम पुन्हा पुन्हा वापरायचा कंटाळा आल्यामुळे किंवा येऊ नये म्हणून जे शब्द वापरतात, ती सर्वनामं. ती तीन प्रकारची असतात. स्वतःला उद्देशून वापरलेली, आपण ज्यांच्याशी बोलतो आहोत त्यांना उद्देशून वापरलेली, आणि आपण ज्यांच्याबद्दल वा ज्याबद्दल बोलतो आहोत त्यांना वा त्याला उद्देशून वापरलेली. मग ती एकवचनी असतील, अनेकवचनी असतील, व्यक्तीसाठी असतील, वस्तूसाठी वा भावनेसाठी वा गुणासाठी असतील, स्त्रीलिंगी-पुल्लिंगी-नपुंसकलिंगी असतील. या फरकांबरहूकूम त्यांच्यात पोटवर्गीकरणं नि तक्ते करता येतील. ते पुन्हा कधीतरी.
३. विशेषण: नाम वा सर्वनाम यांबद्दल वा त्यांच्या गुणांबद्दल अधिक माहिती देणारा शब्द म्हणजे विशेषण. (उदा. चांगली, उंच, गोरी, नकटी, वाह्यात, महाकाय, कसनुशी, लबाड, दुष्ट, समजूतदार, बारीक, अरुंद, आकर्षक, भरपूर, नेत्रदीपक, वेडसर, खट्याळ, संयमी.) विशेषण हे कायम कोणत्या ना कोणत्या, दृश्य वा अदृश्य नामासाठी वा सर्वनामासाठी असतं. त्या नामाचं वा सर्वनामाचं लिंग वा वचन बदललं की काही विशेषणांचं शेवटचं अक्षर बदलतं, काहींचं बदलत नाही. चांगलं स्थळ. चांगला शिरा. चांगली सासू. चांगली स्थळं. चांगले शिरे. चांगल्या सासवा. खट्याळ मूल. खट्याळ कविता. खट्याळ दीर. खट्याळ मुलं. खट्याळ कविता. खट्याळ दीर.
४. क्रियापद: वाक्यातली घटना वा कृती दर्शवणारा शब्द (उदा. होणे, असणे, करणे, वाटणे, लागणे, लिहिणे, वाचणे, झोपणे, जाणे, येणे, खाणे, पिणे, पोहणे, उडणे, बसणे, उठणे, मरणे, जगणे.) या सगळ्या उदाहरणांत शेवटचं अक्षर णे आहे. क्रियापदाचं मूळ रूप असंच णे या अक्षरानं संपवतात. ते काढलं, की जो उरतो, तो त्या क्रियापदाचा धातू. एखादी क्रिया करायची आज्ञा एका लहान मुलाला देऊन पाहा. जे मिळेल तो धातू असेल. ऊठ. पळ. धाव. ऊड. चीड. पड. खा. जा. ये. नीघ. मर. इत्यादी. क्रियापद क्रिया सांगतंय की घटना सांगतंय की अजून काही सांगतंय (होय, अशीही क्रियापदं आहेत!), यावरून त्यांची चाल ठरते. हा भलताच मोठ्ठा विषय आहे. पण कोणत्याही वाक्यात दिसणारं वा न दिसणारं एकतरी क्रियापद असतंच, इतकं लक्ष्यात ठेवणं पुरे.
या चारही जातींचे शब्द वापर करताना 'जस्सेच्या तस्से’ राहत नाहीत. म्हणजे कोशात बघायला गेलात, तर ते त्यांच्या मूळ रूपांत मिळतील. पण वाक्यांमध्ये मात्र त्यांच्या शेपट्या हा-हा म्हणता बदलतात. त्यांना प्रत्यय लागतात. त्यांची सामान्यरूपं होतात. ते ‘चालता-चालता’ मुखडा बदलतात. उरलेल्या चार जातींचे शब्द मात्र काही केल्या बदलत नाहीत. त्यांना विकार उर्फ ‘व्यय’ नाही. म्हणून ती अव्ययं.
५. शब्दयोगी अव्यय : काळवेळ, क्रम, जवळीक, स्थान, कारण, निमित्त, उद्देश, रीत, अभाव, सोबत, अपवाद... अशा अनेक गोष्टी सांगण्याकरता प्रत्ययांसारख्याच, पण प्रत्ययांपेक्षा थोड्या मोठ्या शेपट्या नामांना वा सर्वनामांना जोडायची पद्धत आहे. उदाहरणं पाहिलीत की हे कळेल. लग्नापूर्वी (क्रम), आईजवळ (निकटता), टेबलावर (स्थान), परीक्षेमुळे (कारण), स्वयंपाकासाठी (उद्देश), मैत्रिणीविना (अभाव), वडिलांखेरीज (अपवाद). या सगळ्या उदाहरणांत शब्दाचं सामान्यरूप होऊन त्यांना पूर्वी, जवळ, वर, मुळे, साठी, विना, खेरीज… अशा एरवी अर्थहीन असलेल्या शेपट्या लागलेल्या दिसतील. या शेपट्या कायम शब्दांना जोडून लिहितात (शब्द-योग) आणि त्यांच्यात काहीही बदल होत नाही (अ-व्यय). म्हणून ती शब्दयोगी अव्ययं.
६. उभयान्वयी अव्यय : कुठलेही दोन वा अधिक स्वतंत्र शब्द वा वाक्यं तात्पुरती जवळ आणायची असली, की उभयान्वयी अव्यय वापरतात. दोन शब्द (आई व बाबा) असू देत वा दोन वाक्यं (मी निघालो आणि तेवढ्यात ती आली. पाऊस पडला, पण पाण्याचा तुटवडा आहेच. तू येतोस, की मी जाऊ?) असू देत. कारण देणे, परिणाम सांगणे, पर्याय देणे, विसंगती नोंदवणे, संगती सांगणे… अशी अनेक कामं ही उभयान्वयी अव्ययं करतात. उभय म्हणजे दोन्ही. अन्वय म्हणजे संबंध. दोन गोष्टींतला संबंध सांगणारे न बदलणारे शब्द म्हणजे उभयान्वयी अव्ययं.
७. क्रियाविशेषण अव्यय : विशेषणं जशी नाम वा सर्वनाम यांबद्दल अधिकची माहिती देतात, तशी क्रियाविशेषणं ही क्रियापदाबद्दल अधिकची माहिती देतात. उदा. मी धाडदिशी आपटले. आपटण्याची क्रिया कशी झाली? धाडदिशी. म्हणून ते क्रियाविशेषण. चल, चल, आटप लवकर. कसं आटप? लवकर आटप. म्हणून लवकर हे क्रियाविशेषण. एक गुगली प्रकार म्हणजे, कधीकधी काही शब्दयोगी अव्ययंही क्रियाविशेषणांचे कपडे घालून येतात. उदा. पूर्वी असं होत नसे. कधी होत नसे? पूर्वी. झालं शब्दयोगी अव्ययाचं क्रियाविशेषण. याही शब्दांच्या कानामात्रेत काडीमात्र बदल होत नाही. त्यामुळे हीसुद्धा अव्ययंच.
८. केवलप्रयोगी अव्यय : मानवी भावभावना दर्शवणारे, तोंडून अभावितपणे बाहेर पडणार्‍या उद्गारांसारखे जे शब्द असतात, ती केवलप्रयोगी अव्ययं. उदा. अरेच्चा! आज इकडे कुठे? च्यायला! राडाच झाला की. बाबौ! काय हा पाऊस म्हणायचा की काय! हट! मी अजिबात येणार नाही, तुला हवं तर तू ये. अरेरे! काय ही अवस्था तुमची. ओळखता आली केवलप्रयोगी अव्ययं? अरेच्चा, च्यायला, बाबौ, हट, अरेरे. ही सगळी केवलप्रयोगी अव्ययं. ही बहुतेकदा उद्गारचिन्हांच्या पूर्वी येतात. पण म्हणून उद्गारचिन्ह कायम साथीला असेलच असं मात्र नाही. त्याशिवायही केवलप्रयोगी अव्ययं लिहिली जातात.
तर - या शब्दांच्या जाती. स-ग-ळे शब्द या जातींपैकी कुठल्या ना कुठल्या जातीत बसवता येतात. वाक्यात आल्यावर मात्र त्यांना कसली ना कसली भूमिका बजावायची असते. त्या भूमिकांचंही एक वर्गीकरण आहेच. त्याबद्दल पुढच्या वेळी.

Tuesday 9 June 2020

व्याकरण वजा संज्ञा : विभक्तिप्रत्यय आणि सामान्यरूप

संस्कृत भासणार्‍या लांबलचक नि जोडाक्षरयुक्त शब्दांबद्दल एक सर्वसाधारण राग असतो. त्याचा फटका व्याकरणातल्या संज्ञांनाही बसत असावा. त्यामुळे लोक व्याकरणाबद्दल अधिकाधिक असहिष्णूपणे वागत असणार. संज्ञांचे स्वतःचे फायदे असतात हे मान्य असलं, तरी त्यात पाय अडकून पडायला होऊ नये, म्हणून व्याकरणातल्या संज्ञांबद्दल थोडी मूलभूत स्पष्टीकरणं द्यायचा विचार आहे. आज नंबर चा-ची-चेचा.
~
वाक्यातल्या सगळ्या शब्दांचं त्या-त्या वाक्यापुरतं नेमून दिलेलं एक काम असतं.
उदाहरणादाखल पुढची वाक्यं एकेक करून वाचून पाहा.

बाळू चिंगी मारले.
चिंगी बाळू मारले.
चिंगीने बाळूला मारले.
बाळूने चिंगीला मारले.

पहिल्या दोन वाक्यांत कुणीतरी कुणालातरी मारलं इतकं कळतं. पण नक्की मार देणारा कोण नि खाणारा कोण हे कळत नाही. नंतरच्या दोन वाक्यांत मात्र ते नीटच कळतं. ते कशामुळे कळतं?
ने आणि ला या दोन अक्षरांमुळे कळतं.
या अक्षरांना स्वतःचा असा स्वतंत्र अर्थ नाही. पण एखाद्या शब्दापुढे ती अक्षरं आली, की आपोआप तो शब्द नक्की काय काम करतो आहे, हे पटकन कळतं. अशा, स्वतंत्र अर्थ नसलेल्या, पण दुसर्‍या शब्दाला जोडल्यावर एकाएकी अर्थात भर घालणार्‍या शब्दांना म्हणा, किंवा अक्षरांना म्हणा, प्रत्यय म्हणतात. मराठी भाषेत अशी चिकार मंडळी आहेत.

मला. बाबांना. काकूस. नदीला. मास्तरांनी. वेड्याने. प्रियकराशी. त्याचा. नटीची. लोकांचे. गाढवांच्या. जावेहून. घरून. शाळेत. गावी. मुलांनो.

या स-ग-ळ्या शब्दांमध्ये एक शब्द आणि त्याला जोडलेली एक शेपटी आहे. या वेगळ्या केलेल्या शेपट्या उर्फ प्रत्यय खाली दिलेल्या यादीत सापडतील.

म-ला. बाबां-ना. काकू-स. नदी-ला. मास्तरां-नी. वेड्या-ने. प्रियकरा-शी. त्या-चा. नटी-ची. लोकां-चे. गाढवां-च्या. जावे-हून. घर-ऊन. शाळे-त. गाव-ई. मुलां-नो.

ही फोड नीट पाहिली, तर आणखीही एक मजेशीर गोष्ट लक्ष्यात येईल. प्रत्यय वेगळे केले, की मूळ शब्द मिळायला हवा. पण तो कायमच मिळतो असं नाही. काकूस = काकू + स. या उदाहरणात काकू स्वतंत्र होताना जशीच्या तशी उरली. पण प्रियकराशी = प्रियकरा + शी या उदाहरणात मात्र प्रियकर वेगळा होताना त्याला एक काना लागून त्याचं प्रियकरा असं रूप तयार झालं.
मराठीतल्या बहुतांश शब्दांची, प्रत्यय लागल्यावर अशी थोडी वेगळी रूपं तयार होतात, असं लक्ष्यात येईल. या रूपांना सामान्यरूप असं म्हणतात. प्रत्ययाची शेपटी चिकटवून घेताना काही शब्दांचं होणारं हे रूपांतर ही मराठी भाषेची खासियत आहे. परकीय शब्दांचं मराठीकरण करून घेताना आपण बेमालूमपणे हे करत असतो. टेबल हा वास्तविक इंग्रजी शब्द. पण ‘चढ की त्या टेबलावर‍!’ असं सांगताना आपण टेबल या शब्दाचं टेबला असं रूपांतर नकळत करतो. ‘डॉक्टरांना किती मोठा धोका आहे सध्या!’ या वाक्यात डॉक्टर या इंग्रजी शब्दाचं डॉक्टरां असं रूपांतर करतो. मराठीचा साज परकीय शब्दांना घालून त्यांना आपलंसं केल्याची ही खूणच. किती मस्त लकब आहे ना भाषेची?
प्रत्ययांचे निरनिराळे प्रकार असतात. आपण वर पाहिला तो 'विभक्तिप्रत्यय' हा त्यांतला एक. तसंच प्रत्यय नसलेल्या आणखीही काही शेपट्या मराठीत अगदी सररास वापरतात. त्याबद्दल पुढच्या वेळी...

Friday 11 May 2018

बोली आणि ग्रांथिक

फक्त औपचारिक वा पुस्तकी भाषेलाच लेखननियम असतात असं नव्हे; तर छापल्या वा लिहिल्या जाणार्‍या सगळ्या प्रकारच्या मजकुराला ते असतात. औपचारिक लेखनासाठीच्या नियमांहून वेगळे, मजकुराच्या प्रकृतीनुसार बदलणारे, क्वचित लेखनहेतूला अनुसरून अपवादांना जागा करून देणारे - पण नियम असतात. निरनिराळे नियम अनुसरणार्‍या लेखी भाषेचे दोन प्रकार पडतात - बोली आणि ग्रांथिक.

बोलीसाठीच्या लेखननियमांचा (!) विचार करताना ज्या गोष्टी जमेस धराव्या लागतात, त्या या टिपणात आहेत. त्या खालीलप्रमाणे -

मात्रा आणि शिरोबिंदू :
'आज माझे काहीच काम होत नाहीसे दिसते' आणि 'आज माझं काहीच काम होत नाहीसं दिसतं' या दोन्ही वाक्यांचा अर्थ एकच आहे. पण पहिलं वाक्य एकतर जुन्या वळणाचं वा पुस्तकी भाषेतलं, औपचारिक थाटाचं आहे. दुसरं मात्र उघडच अनौपचारिक आणि सध्या बोलण्याच्या पद्धतीला अनुसरून असलेल्या बोलीतलं आहे. हा फरक झाला आहे, तो मात्रांच्या जागी दिलेल्या शिरोबिंदूंमुळे. मात्रेच्या ऐवजी दिलं जाणारं, दीर्घ उच्चार दर्शवणारं, बोली भाषा सूचित करणारं, र्‍हस्व अक्षराच्या डोक्यावरचं टिंब म्हणजे शिरोबिंदू. तो अनुस्वार नव्हे. अनुस्वार आणि शिरोबिंदूत दर्शनी फरक काही नाही. तरीही संदर्भानं आपण अचूकपणे त्यांचे उच्चार वेगळाले करतो. शिरोबिंदूचा उच्चार अनुनासिक नसतो. त्या-त्या अक्षराचा उच्चार लांबवावा इतकंच सुचवण्यापुरता त्याचा अर्थ. शिरोबिंदू बहुतेकदा शब्दातल्या शेवटच्या अक्षरावर दिला जातो. पण कायम ते तसंच असेल, असं काही नाही. 'आज मला काहीच करावंसं वाटत नाही' या वाक्यात 'वं' हे अक्षर शब्दाच्या अखेरीस येत नसूनही शिरोबिंदू आला आहेच. ना. गो. कालेलकरांनी असा अंदाज वर्तवला आहे, की मात्रा असलेले जुनाट उच्चार फक्त लेखनात उरले असावेत आणि भाषा उत्क्रांत होताना बदलत गेलेल्या उच्चारांचं दर्शन या शिरोबिंदूतून होत असावं. असेलही. तूर्तास असं दिसतं, की बोलीमधल्या या शिरोबिंदुयुक्त मराठीचा वावर आता हळूहळू हातपाय पसरतो आहे आणि औपचारिक, सार्वजनिक, ग्रांथिक भाषा वापरण्याचा रिवाज असलेल्या ठिकाणीही बोली रुळू लागली आहे.

इडागम :
इडागम या प्रकरणाच्या तांत्रिक तपशिलांत न शिरता स्पष्टीकरण द्यायचं, तर धातूची रूपं करताना, हल्ली अनावश्यक वाटणारी एक वेलांटी देऊनही क्रियापदाची काही रूपं करता येतात. ही वेलांटी म्हणजे इडागम. 'तो सकाळपासून रात्रीपर्यंत काम करीत असे' आणि 'तो सकाळपासून रात्रीपर्यंत काम करत असे' यांत 'करत' आणि 'करीत' अशी दोन रूपं आहेत. दोन्हीचा अर्थ एकच आहे. पण वेलांटीसह असलेलं रूप जुनं आहे, तर वेलांटीशिवायचं नवीन. जुन्या रूपात जे घडतं, त्याला इडागम म्हणतात. तो एक वेळ ग्रांथिक मराठीत आला तर चालेल. पण बोली मराठीत? एखाद्या जुन्या वळणाच्या पंतोजींच्या तोंडी हे वाक्य घालायचं असेल, तर आणि तरच. एरवी नाही.

वे कृदन्त, स / ला / ते प्रत्यय आणि 'साठी' हे शब्दयोगी अव्यय :
'करण्यासाठी', 'करायला', 'करण्यास' आणि 'करावयास' या चार रूपांपैकी पहिली दोन्ही अगदी सध्याकालीन आहेत. तिसरं अजूनही ग्रांथिक मराठीत वापरलं जातं, पण बोली मराठीत नाही. चौथं तर अगदी आजोबाकालीन आहे. औपचारिक तर आहेच, पण जुनाटही आहे.

ने प्रत्ययाची रूपं :
'आईनं', 'आईनी' आणि 'आईने' ही तिन्ही रूपं बरोबरच. पण पहिली दोन्ही निरपवाद बोली, तर तिसरं ग्रांथिक.

'-तील' आणि '-तला' / '-तली' / '-तले' / '-तल्या':
'घरातील' आणि 'घरातल्या' काय बरोबर? तर दोन्ही बरोबरच. पण 'माझ्या घरातील माणसांना नीटनेटकेपणा अगदी खपत नाही!' आणि 'माझ्या घरातल्या माणसांना नीटनेटकेपणा अगदी खपत नाही!' यांतलं पहिलं वाक्य खास ग्रांथिक वा औपचारिक आहे. तर दुसरं नक्की बोली वा अनौपचारिक.

***

या सगळ्या घटकांच्या वापरामध्ये एकवाक्यता असावी, असा प्रयत्न मुद्रितशोधक करत असतो. म्हणजे -

'आईने मला काम करावयास / करण्यास सांगितले व मी ते करीत असतानाच माझ्या अंगातील कपडे घामाने भिजून मला बरे वाटेनासे झाले'

आणि

'आईनं / आईनी मला काम करायला सांगितलं आणि मी ते करत असतानाच  माझ्या अंगातले कपडे घामानं / घामानी भिजून मला बरं वाटेनासं झालं'

या दोन्ही वाक्यांत ग्रांथिक किंवा बोली, औपचारिक किंवा अनौपचारिक, जुनाट किंवा सध्याकालीन, सार्वजनिक किंवा खासगी अशी निवड एकाहून अधिक ठिकाणी केलेली आहे आणि एकदा ती केल्यावर पुढच्या निर्णयांतही तीच कायम राखलेली आहे. ('व' हे उभयान्वयी अव्यय ग्रांथिक, औपचारिक, सार्वजनिक, जुनाट अशांपैकी निवडीला जवळचं; तर 'आणि' (किंवा 'नि') हे उभयान्वयी अव्यय बोली, अनौपचारिक, खासगी, सध्याकालीन निवडीला जवळचं - हाही असाच एक संकेत. नियम नव्हे!)

या एकवाक्यतेच्या संकेतालाही अपवाद असणारच. पण ते त्या-त्या वेळी, संदर्भांनुसार, लेखकाच्या उद्देशांनुसार बदलतील, याचं भान बाळगणं आवश्यक. तूर्तास ही संकेतांची नोंद केवळ.

Saturday 5 May 2018

र हे अक्षर जरा राडेबाजच आहे

र हे अक्षर जरा राडेबाजच आहे. जोडाक्षरं आणि उकारही लिहिताना रच्या बाबतीत जाम झोल होतात.


- रला दोन प्रकारचे उकार द्यायचे असतात याचा अनेकांना पत्ताच नसतो. रच्या पोटात एक लहानसा अर्धगोल काढला की झालं, असा गोड समज असतो. पण रला ऱ्हस्व उकार द्यायचा असेल, तेव्हा विनागाठीचा अर्धगोल, दीर्घ उकार द्यायचा असेल तेव्हा दिसे न दिसेशी आडवी रेष देऊन गाठीचा तिरका उकार काढतात, हे आपण बहुतेक बाराखडी शिकतो तेव्हाच विसरून येतो. रु - ऱ्हस्व उकार. मारुती. रुसवा. अरुण. रुमाल. रू - दीर्घ उकार. करून. रूप.
- र हे अक्षर जोडायचं असेल, तर त्याचे चार निरनिराळे प्रकार होताय. रेफ (रफारचिन्ह), पापणीच्या केसासारखी आडवी रेष (हे दोन प्रकार र + व्यंजन या जोडणीसाठी), अक्षराच्या पोटात जाणारी लहानशी तिरकी रेष आणि अक्षराच्या पायथ्याशी जोडला जाणारा लहानसा त्रिकोण (विनाशेंडीच्या काकपदचिन्हासारखा) (हे दोन प्रकार व्यंजन + र या जोडणीसाठी). कोणत्या अक्षराला आणि उच्चाराला कोणता र वापरायचा हे ठरलेलं आहे.
...रवर आघात देऊन उच्चार होणार असेल तर रेफ. सूर्य. गर्भ. अर्ज. अर्हता.
...रच्या नंतर य किंवा ह ही अक्षरं येणार असतील आणि रच्या उच्चारात आघात नसेल तर पापणीच्या केसासारखी रेघ. सुऱ्या. कुऱ्हाड. ऱ्हास.
...अक्षरात आख्खा स्वरदंड असेल (क या अक्षरातली मधली उभी रेघ म्हणजे स्वरदंड. द या अक्षरात वरची छोटुकली उभी देठरेष म्हणजे स्वरदंड. तो असतोच. पण सगळीकडे उभाच्या उभा, आख्खा असतो असं मात्र नाही.) तेव्हा एक लहानशी तिरकी रेष, जी अक्षराच्या पोटात जाते. प्रकाश. नम्रता. व्रण. ब्र. स्रोत. सहस्र. (हॉय. इथे केवळ रकार आहे. त्रकार नव्हे! सहस्त्र आणि स्त्रोत चूक आहेत. शस्त्र मात्र बरोबर.)
...याला अपवाद दचा. स्वरदंड आख्खा नसूनही दची खालची शेपटी असल्यामुळे त्याला त्रिकोण न जोडता रेषच जोडली जाते. द्रुतगती.
...अक्षराला देठासारखा छोटुसा स्वरदंड असेल तेव्हा अक्षराच्या पायथ्याशी लहानसा त्रिकोण जोडला जातो. ड्रम. ट्रम्प.
- र आणि ऋ यांच्यात घोटाळा करायचा नाही. अक्षराच्या पायथ्याशी येणाऱ्या लहानश्या वाटीसारखं चिन्ह हे ऋकाराचं. कृष्ण. पृष्ठ. मृत. आकृती.
- श हे अक्षरही थोडं घोळू आहे. श्र या अक्षरात खालची जी लहानशी तिरकी रेष आहे, तो र आहे आणि ती काढल्यावर जे उरतं ते श या अक्षराचंच रूप. (म्हणूनच विश्वास लिहिताना शचं रूप बदलूनही लिहिता येतं!) श्री = श् + र + ई. शृंगारात ऋकार आहे, रकार नाही. त्यामुळे श्र काढून त्याला खाली अर्धी वाटी जोडायचा आगाऊपणा करायचा नाही.
- त या अक्षराच्या पोटात तिरकी रेष दिली की त्र होतो. त् + र = त्र. य नाकातून म्हटला की जो उच्चार होतो, तो ञ. त्र निराळा आणि ञ निराळा. ञ हे च-छ-ज-झ-ञ या मालेतलं अनुनासिक अक्षर. (अवांतर: ञ हे अक्षर अर्ध्या जला जोडलं की ज्ञ मिळतो. ज् + ञ = ज्ञ. पण आपण ज्ञचा उच्चार जवळपास द् + न् + य असा माणसाळवला आहे! मूळ उच्चारही साधारण जवळपासचा आहे. करून पाहा.) (ञ-मॅन मला 'ञाही - अर्र - त्राही भगवान' करून सोडणार आहे या कानपिचकीबद्दल. पण क्या करें!)
वर्णमालेबद्दल पुन्हा कधीतर्री.  
तळटीप :
फेसबुकावर पूर्वप्रकाशित असलेल्या या टिपणाचा दुवा.

परश्या आणि आर्ची यांची अभेद्य जोडी : अर्थात शब्दयोगी अव्ययं कशी लिहावीत!

परश्या ला भेटण्या साठी पार आपल्या घरा पासून शेता पर्यंत चालत जायला देखील आर्ची कमी करत नाही. तिच्या ने धीर च धरवत नाही. त्या साठी हवी तरी प्रिन्स ची बाईक सुद्धा लंपास करते ती कधी-कधी. तिच्या असल्या बिनधास्त वागण्या मुळे च परश्या तिच्या वर फिदा आहे. तिच्या कडे प्रेमा नं हसून बघण्या शिवाय तो दुसरं करणार तरी काय?

परश्याला भेटण्यासाठी पार आपल्या घरापासून शेतापर्यंत चालत जायलादेखील आर्ची कमी करत नाही. तिच्याने धीरच धरवत नाही. त्यासाठी हवी तरी प्रिन्सची बाईकसुद्धा लंपास करते ती कधी-कधी. तिच्या असल्या बिनधास्त वागण्यामुळेच परश्या तिच्यावर फिदा आहे. तिच्याकडे प्रेमानं हसून बघण्याशिवाय तो दुसरं करणार तरी काय?

यांपैकी कोणतं लेखन बरोबर आहे?
अर्थातच दुसरं.
पण विशेषकरून इंटरनेट आणि मोबाईलफोनवर वापरल्या जाण्यार्‍या मराठीत पहिल्या प्रकारची अनंत वाक्यं सापडतात आणि वाचणार्‍यालाही त्यात काही खटकत नाही. अलीकडे विभक्तिप्रत्यय आणि शब्दयोगी अव्ययं शब्दापासून तोडून लिहिण्याची एक फ्याशनच बोकाळलेली दिसते. तिचा उगम नक्की कुठे आहे, ते सांगणं कठीण. हिंदीत, इंग्रजीत, निरनिराळ्या कळपाटांनी दिलेल्या पर्यायांमध्ये की निव्वळ निष्काळजीपणात.... हे सांगणं कठीण. पण भले-भले लोकही ही चूक करताना दिसताहेत.
शब्दयोगी अव्ययं आणि विभक्तिप्रत्यय नामा-सर्वनामांना जोडून लिहिणं आणि ते जोडण्यासाठी त्या-त्या नामांचं सामान्यरूप तयार होणं हे मराठी भाषेचं वैशिष्ट्य आहे. मुदलात या दोन्ही घटकांच्या नावातच त्यांच्या लेखनाचा स्पष्ट निर्देश आहे. शब्दयोगी म्हणजे शब्दाला जोडून. विभक्तिप्रत्यय या शब्दामधल्या प्रत्यय या घटकाचा अर्थ आहे शब्दाला लागलेलं शेपूट. अर्थात शब्दाला जोडूनच त्याचं लेखन होतं. ही शेपटं शब्दाला जोडण्यापूर्वी त्या-त्या शब्दामध्ये अनेकदा (नेहमी नाही, सगळ्याच नामांमध्येही नाही) काहीतरी बदल होतो. उदाहरणार्थ – तिच्या बहिणीचं त्याच्या भावावर प्रेम आहे. मूळ नाम बहीण. सामान्यरूप बहिणी. मग त्याला षष्ठीचा प्रत्यय (चं) लागला. बहिणीचं. किंवा मूळ नाम भाऊ. सामान्यरूप भावा. त्याला शब्दयोगी अव्यय (वर) चिकटलं. भावावर.
ही अजून काही उदाहरणं -
भेटणे -> सामान्यरूप – भेटण्या -> + शब्दयोगी अव्यय – साठी -> भेटण्यासाठी
ती – सामान्यरूप – ति -> + विभक्तिप्रत्यय – च्या -> तिच्या
- विभक्तिप्रत्यय लागलेल्या शब्दापुढेदेखील शब्दयोगी अव्यय येऊ शकतं. (ती (ति) + च्या + साठी -> तिच्यासाठी)
- नामाला लागलेल्या एका शब्दयोगी अव्ययापुढेच दुसरंही शब्दयोगी अव्यय जोडलं जाऊ शकतं. (वागणे (वागण्या) + मुळे + च -> वागण्यामुळेच)
- एकाच नामाला दोन विभक्तिप्रत्ययही लागू शकतात. (ति + च्या + ने -> तिच्याने)

मराठीतली शुद्ध शब्दयोगी अव्ययं खालीलप्रमाणे. (अजूनही हीS भली मोठी यादी आहेच. पण ती द्यायची म्हणजे एक लहानशी पुस्तिकाच लिहावी लागेल.) ही फक्त आणि फक्त शब्दयोगी अव्ययंच आहेत. त्यांच्यामागे नामाचा वा सर्वनामाचा डबा जोडल्याखेरीज त्यांना काहीही अर्थ नाही.
ऐवजी, 
कडे, 
च, 
देखील, 
पर्यंत, 
पासून, 
प्रमाणे, 
मुळे, 
साठी, 
सुद्धा
मराठीमधले विभक्तिप्रत्यय सोबत जोडत आहे. (त्यांपैकी बरेचसे केवळ काव्यात – तेही जुन्या – उरले आहेत. ती यादी अपडेटवायला हवी आहे. झालंच, तर कारक आणि विभक्ती हा घोळही धड सोडवायला हवा आहे. पण ते फिर कभी!)
तेवढी फुकटची तोडफोड टाळा बुवा!

---
भाषा आपली सर्वांचीच आहे. उच्चारांत तर वैविध्य असतंच. मात्र निदान प्रमाणभाषेच्या लेखनात ते असू नये, ही अपेक्षा आपल्याच सोयीसाठी आहे. त्यासाठी केलेले नियम आणि संकेतही आपल्याच सोयीसाठी आहेत. ते बदलून हवे असतील तर त्यासाठी दबाव आणावा लागेल. ॲप्ससारख्या सोयी अधिक सुखकर हव्या असतील, तरीही आपल्याला सजग राहावं लागेल. आणि त्यासाठी मुदलात आपल्या प्रमाणभाषेचे नियम माहीत तरी करून घ्यावे लागतील. ॲप बदला, नियम बदला, संवाद झाल्याशी कारण... म्हणून नियम उधळून लावणं
ह्या सगळ्या सबबी आहेत. आपल्याच भाषेला हिंदी वा इंग्रजीची बटीक करणाऱ्या. तरीही त्या वापरण्याचं स्वातंत्र्य आहेच. कसलीही जबरदस्ती नाही. 

तळटीप :
फेसबुकावर प्रकाशित झालेल्या टिपणाचा हा दुवा.

उभे आणि आडवे : जोडाक्षरे कशी लिहावीत?

देवनागरी लिपीत जोडाक्षरे लिहिण्याचे तीन प्रकार आहेत. आडवी जोडणी, उभी जोडणी आणि अक्षराचा पाय मोडून त्याचे अर्धेमुर्धेपण दाखवणे.
(शिवाय अनुस्वार - विशेषकरून तत्सम शब्दांच्या बाबतीत - अनुनासिकासह जोडून लिहिता येतो. ज्या अक्षराच्या आधी अनुस्वार लिहायचा, त्या अक्षराच्या वर्णमालेतल्या ओळीच्या शेवटचे अनुनासिक त्याला अर्धे करून जोडायचे. उदाहरणार्थ - कांचन - काञ्चन. (च-छ-ज-झ-ञ). टिळकांची ती सुप्रसिद्ध 'संत, सन्त आणि सन्+त' गोष्ट अनेकांना ठाऊक असते. तिच्यात हाच नियम वापरला आहे. या नियमामुळे बहुतांश अनुनासिकयुक्त जोडाक्षरे अनुस्वारासह लिहिता येतात. पण हे विषयांतर झाले.)
पाय मोडून लिहिणे सर्वाधिक सोपे. आडवी जोडणी त्याहून थोडी कठीण. तर उभी जोडणी अधिकच कठीण.
पाय मोडून लिहिताना कोणतेही अक्षर पूर्ण नाहीसे होत नाही. फक्त त्याच्या पायाशी दिलेल्या हलक्यासा तिरक्या चिन्हामुळे ते अर्धे असल्याचा बोध करून दिला जातो.

आडव्या जोडणीत अक्षरे एकमेकांत हलकी मिसळली गेल्याचा भास होतो. दोन माणसांनी एकमेकांना खेटून उभे राहावे आणि त्यामुळे त्यातल्या डावीकडल्या माणसाचा उजवीकडचा काही भाग दुसर्‍या माणसाआड जाऊन दिसेनासा व्हावा तशी ही जोडणी. जे अक्षर अर्धे, ते आधी लिहायचे आणि ते काहीसे अर्धेमुर्धे दिसते. सगळ्या जोडाक्षरांची आडवी जोडणी होतेच असे नाही. ही जोडणीही तशी वैशिष्ट्यपूर्णच. 
पण -

उभी जोडणी अधिक कठीण आणि अधिक वैशिष्ट्यपूर्ण. हिच्यात एका अक्षराने दुसर्‍या अक्षराला कडेवर वा डोक्यावर घेतले आहे असा भास होतो. जर त्या जोडाक्षराच्या वाचनाचा सराव वा जाणत्या माणसाचे मार्गदर्शन नसेल, तर कुठले अक्षर अर्धे व कुठले पूर्ण आहे, हे नीटसे कळणे जड जाते. सगळ्या जोडाक्षरांची उभी जोडणीही होतेच असे नाही.
या तीनही जोडण्यांखेरीज 'र'सारखी काही छळवादी अक्षरे अनेक निरनिराळ्या प्रकारे जोडली जातात (रफार, पापणीच्या केसासारखा अर्धगोलाकार, तिरकी रेष, छोटासा काकपदचिन्हासारखा त्रिकोण इत्यादी). क्ष (क् + ष), ज्ञ (ज् + ञ) ही जोडाक्षरे आहेत हे आपल्याला ठाऊकच नसते. श या अक्षराचा अर्धेपणा लिहायची मराठीतली पद्धत आपल्याला ठाऊक नसते. पण हे अपवाद. त्याबद्दल सरावाने ठाऊक होते. तोवर खाली काही जोडाक्षरांची फोड, आडवी जोडणी, उभी जोडणी आणि पाय मोडून लिहिणे यांची उदाहरणे दिली आहेत. हाती लिहून फोटो काढण्याचे कारण, सगळ्या कळफलकांत एकवाक्यता नसते. अर्थात हाती लिहिण्यात आणि छापील अक्षरांत आणि जोडाक्षरांतही फरक असतोच. पण त्याला तूर्तास इलाज नाही. (बाकी ल आणि श लिहिण्याच्या काही शासनमान्य, मग शासनबाह्य आणि पुन्हा शासनमान्य पद्धती आहेत. त्यांबद्दल पुन्हा कधीतरी.)
अशा तीनही प्रकारे जोडाक्षरे लिहिता येणे हे देवनागरीचे आणि पर्यायाने मराठीचे वैशिष्ट्य आहे. संगणकीय सोयींच्या नावाखाली त्याची गळचेपी होऊ नये. तंत्रज्ञांना आणि सर्वसामान्यांना या सगळ्या जोडण्या ठाऊक असतील, तर थोडे कष्ट घेऊन कळपाट बनवणारे आणि टंक बनवणारे लोकही या निरनिराळ्या पर्यायांचा समावेश करतील अशी आशा करत ही पोस्ट लोकहितार्थार्पण.  

***

तळटीप :
फेसबुकावर हे टिपण प्रसिद्ध झालं होतं. हा त्याचा दुवा.

'आपण' यांना पाहिलंत का?

मराठीत दोन प्रकारची अनेकवचनी प्रथमपुरुषी सर्वनामं आहेत. आम्ही आणि आपण. इंग्रजीत त्यांचं वर्णन exclusive we नि inclusive we असं करतात. हे मला माहीत होतं. पण त्याचं अधिक चपखल वर्णन मराठीतूनच करायचा प्रयत्न करत होते. ते काहीसं असं झालं :

आम्ही :
1) बोलणारी व्यक्ती स्वतःला एखाद्या गटाचा एक भाग मानते आहे.
2) ती व्यक्ती ज्याच्याशी वा ज्यांच्याशी बोलते आहेत्याला वा त्यांना ती आपल्या गटाचा एक भाग मानत नाही.
3) अशी व्यक्ती आपल्या गटाबद्दल त्या दुसर्‍या व्यक्तीशी वा व्यक्तींशी बोलताना स्वतःच्या गटाला उद्देशून 'आम्हीहे सर्वनाम वापरते.
4) या संभाषणात प्रथमपुरुषी सर्वनाम अनेकवचनी आहे. ते म्हणजे 'आम्ही'. द्वितीयपुरुषी सर्वनाम 'तूकिंवा 'तुम्हीआहे. आम्ही आणि तू / तुम्ही हे दोन गट इथे स्पष्ट विभागलेले आहेत. त्या दोन गटांमध्ये निदान या वाक्यापुरता तरी कोणताही सामायिक भाग (overlapping section) नाही.

आपण :
1) बोलणारी व्यक्ती स्वतःला एखाद्या गटाचा भाग मानते आहे.
2) ती व्यक्ती ज्याच्याशी वा ज्यांच्याशी बोलते आहेत्याला वा त्यांनाही ती आपल्या गटाचा एक भागच मानते.
3) अशी व्यक्ती आपल्या गटाबद्दल त्या दुसर्‍या व्यक्तीशी वा व्यक्तींशी बोलते आहे.
4) दुसरी व्यक्ती वा दुसर्‍या व्यक्तीही बोलणार्‍या व्यक्तीच्या गटातच मोडत असल्यामुळेबोलण्याचे स्वरूप हे असं आहे  : गटातील व्यक्ती-गटाबद्दल-गटातील व्यक्तीशी -गट-गटागटाबद्दल-गटाशी. 
5) या संभाषणात प्रथमपुरुषी सर्वनाम अनेकवचनी आहे. ते म्हणजे 'आपण'. द्वितीयपुरुषी सर्वनाम कोणतं आहे इथेतेही 'आपण'च! बोलणारी व्यक्ती आणि ऐकणारी व्यक्ती वा ऐकणार्‍या व्यक्ती या दोन गटांमध्ये इथे स्पष्ट विभाजन नाही. जणू मी माझ्याशीच माझ्याबद्दलच बोलते आहे असा भाव. कारण या दोन गटांमध्ये स्वच्छ जाणवणारा सामायिक भाग (overlapping section) आहे.

तर - असं आपलं आपल्यापाशीच (!) समजून घेतानामला साक्षात्कार झाला की आपण हे सर्वनाम फक्त प्रथमपुरुषी नाहीते द्वितीयपुरुषीही आहे!

आता हे तपासून पाहणं आलं. यासाठी लगोलग दोन सोप्या चाचण्या आठवल्या. प्रथमपुरुषी आणि द्वितीयपुरुषी सर्वनामाच्या व्याख्येची एक. आणि आज्ञार्थाची दुसरी.

वक्ता किंवा लेखक स्वतःकडेच निर्देश करण्यासाठी ज्या सर्वनामाचा उपयोग करतो ते प्रथमपुरुषी. या निकषानुसार आपण हे सर्वनाम प्रथमपुरुषी झालं. (आपण [सगळे] जेवायला जाऊ या का? -> 'आपण'मध्ये बोलणारी व्यक्तीही गृहीत आहे.) ज्याच्याशी वक्ता बोलतो किंवा ज्याच्यासाठी लेखक लिहितोत्याला उद्देशून असलेलं सर्वनाम ते द्वितीयपुरुषी. या निकषानुसार आपण हे सर्वनाम द्वितीयपुरुषीही झालं. (आपण [सगळे] जेवायला जाऊ या का? -> 'आपण'मध्ये ज्याच्याशी वा ज्यांच्याशी बोललं जातं आहेती वा त्या व्यक्तीही आहेत.) म्हणजे ही चाचणी यशस्वी.

आज्ञार्थ किंवा ऊआख्यात ज्याला म्हणतातत्यात द्वितीयपुरुषी आणि क्वचित प्रथमपुरुषी सर्वनामांना उद्देशून केलेलं बोलणं असतं. हे बोलणं सहसा आज्ञासौम्य आज्ञाइच्छा आणि मग आज्ञा अशा प्रकारांत मोडतं. या निकषानुसार प्रथमपुरुषी आणि द्वितीयपुरुषी आज्ञार्थी वाक्यं तयार करून पाहिली.
1) आता हा पुढच्या पानावरचा तक्ता पाहा. (तू या द्वितीयपुरुषी सर्वनामाला उद्देशून)
2) हां पोरींनोजपून. मध्ये हलका उतार आहेअशा इकडून चला. (तुम्ही या द्वितीयपुरुषी अनेकवचनी सर्वनामाला उद्देशून)
3) पण श्री. फडकेअसं काय करतातुम्ही मला एकदा फोन नाही का करायचात? (तुम्ही या द्वितीयपुरुषी एकवचनी - आदरार्थी सर्वनामाला उद्देशून)
4) महाराजआपण परवानगीसाठी थांबायची गरज नाहीचला. (आपण या द्वितीयपुरुषी एकवचनी अत्यादरार्थी (;-)) सर्वनामाला उद्देशून)
5) झालं लिहूनआण इकडे. पाहू बरं. (इथे 'आणहे 'तूया द्वितीयपुरुषी एकवचनी सर्वनामाला उद्देशून आहेतर 'पाहूहे नक्की कुणाला उद्देशून आहेते लगेच ठरवणं जड जातं. पण थोडा विचार केला की लक्ष्यात येतंते स्वतःला उद्देशून - अर्थात प्रथमपुरुषी सर्वनामाला उद्देशून आहे.)
6) असं करूयेत्या शनिवारी पहाटेच निघूम्हणजे उन्हाच्या आत पोचता येईल. (इथे 'करूआणि निघूही दोन्ही क्रियापदं बोलणार्‍या व्यक्तीलाही उद्देशून आहेत (प्रथमपुरुषी) आणि ज्यांच्याशी बोलणं होतं आहेत्या व्यक्तीला वा व्यक्तींनाही (द्वितीयपुरुषी) उद्देशून आहेत. हे दोन्ही पुरुषांसाठी लागू असणारं अध्याहृत सर्वनाम आहे - आपण.) अर्थातइथे असा वाद संभवू शकतोकी जरी 'आपण'मध्ये 'मीआणि 'तुम्हीहे दोन्हीही अंतर्भूत असलंतरीही बोलणारी व्यक्ती स्वतःचा वाढीव भाग म्हणून या गटाचा निर्देश करते आहेआणि त्यामुळे 'आपण'चं वर्गीकरण करताना ते प्रथमपुरुषात केलं पाहिजे. त्याचा प्रतिवाद असा : दोन्ही पुरुषांचा सहभागाबद्दल मतभेद तर नाहीच. मग कोणता पुरुष प्रबळ 'भासतोते ठरवून दुसर्‍या पुरुषाची हकालपट्टी का करावीदोन्ही पुरुषांचा अंतर्भाव 'inclusive आपण'मध्ये आहेअसं का म्हणू नये?

इथे साक्षात मोरो केशवांची साक्ष काढावी म्हणून 'शास्त्रीय मराठी व्याकरणउघडलंतर ते म्हणत होते - स्वतः आणि आपण या दोन सर्वनामांना स्वतःचा पुरुष असा नाहीच.

स्वतः हे कायम कोणत्या ना कोणत्या सर्वनामाला लागून येतं आणि त्या सर्वनामाचा पुरुष धारण करतं. उदाहरणार्थ - मी स्वतः उठून रांधीन तेव्हा मुखी घास पडायचा! किंवात्यांनी स्वतःच मला तसं सांगितलंखोटं कसं असेल? (तर हे बरोबरच. पण यावर विचार करताना मला आणिक एक उदाहरण सुचलं - आपण स्वतः मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही. आता इथे पुरुष कुठला हो धरायचा दामले आजोबा?!)

या सर्वनामांना पुरुष नाहीच असं म्हणणं जर तांत्रिकदृष्ट्या स्वीकार्य आहेतर मग त्यांचं वर्गीकरण त्या-त्या सगळ्या पुरुषांत केलं म्हणून चुकलं कुठे?

खेरीज 'आपण'चे फक्त प्रथमपुरुषी एकवचनी (पक्या स्वतःशी विचार करू लागलाआपण इतकं केलं टवळीसाठीतरी ही बेवफा ती बेवफाच!)प्रथमपुरुषी अनेकवचनी ("होय कीआपण मर मर मरावंतेव्हा कुठे मालकाचं समाधान होणार..." लक्ष्मीचं म्हणणं त्या सगळ्यांच्याच मनात घर करून होतं.)द्वितीयपुरुषी अत्यादरार्थी एकवचनी वा अनेकवचनी ("राजेआपण आमच्या घरी आलातआम्ही धन्य झालो!") उपयोग आहेतच.

चिटवळपणा करायचातर 'आपण'चा खोचक आदरार्थी वापर (मधोबाआपण 'शहाणेआहात झालं. निघा!) आहेच. पण तो द्वितीयपुरुषीच म्हणायचा.

झालंच, तर 'खुद्द' या शब्दाचा विचार दामल्यांनी केलेला दिसत नाही. संस्कृतकेंद्री विचार करण्याच्या पद्धतीचा तो परिणाम असावा. पण 'खुद्द' हेही एक 'स्वतः'ला समांतर असं सर्वनाम आहेच. तेही मुख्य सर्वनामाला जोडूनच येतं. फक्त त्याची जागा मुख्य सर्वनामाच्या आधी आलेली दिसते. उदाहरणार्थ,

- तिनं स्वतः उठून पाणी शेंदलं.
- खुद्द ती उठली, तेव्हा कुठे काम झालं.

पुढे-मागे यात या 'खुद्द'चीही (आणि 'दस्तुरखुद्द'चीही) जिरवणी करणे आहे, ही नोंद. 

अखेरीस तक्ता केलातो काहीसा असा :

काही चूकभूल दिसत असेल तर सांगा. सुधारणा करता येईल. बाकी या निमित्तानं लक्ष्यात आलेली गोष्ट, मोरो केशव दामले आजोबांच्या 'शास्त्रीय मराठी व्याकरणा'चं काळानुरूप पुनर्लेखन कुणीतरी करायला हवं आहे.

टिपा :

1. ए सेन मॅन आणि धनंजय यांच्याशी झालेल्या चर्चेमुळे या टिपणात मोलाची भर पडली आहे. दोघांचेही आभार.
2. या सर्वनामांमध्ये प्रश्नार्थक सर्वनामांचा विचार केलेला नाही. तो स्वतंत्रपणेच केलेला सोयीचा जाईल.
3. मोरो केशव दामले यांचा 'शास्त्रीय मराठी व्याकरण' हा ग्रंथ इथे मिळेल.
4. हे टिपण फेसबुकावरही दोन आवृत्त्यांमध्ये प्रकाशित झालं होतं, त्याचे दुवे अ) आणि आ)