Saturday 5 May 2018

र हे अक्षर जरा राडेबाजच आहे

र हे अक्षर जरा राडेबाजच आहे. जोडाक्षरं आणि उकारही लिहिताना रच्या बाबतीत जाम झोल होतात.


- रला दोन प्रकारचे उकार द्यायचे असतात याचा अनेकांना पत्ताच नसतो. रच्या पोटात एक लहानसा अर्धगोल काढला की झालं, असा गोड समज असतो. पण रला ऱ्हस्व उकार द्यायचा असेल, तेव्हा विनागाठीचा अर्धगोल, दीर्घ उकार द्यायचा असेल तेव्हा दिसे न दिसेशी आडवी रेष देऊन गाठीचा तिरका उकार काढतात, हे आपण बहुतेक बाराखडी शिकतो तेव्हाच विसरून येतो. रु - ऱ्हस्व उकार. मारुती. रुसवा. अरुण. रुमाल. रू - दीर्घ उकार. करून. रूप.
- र हे अक्षर जोडायचं असेल, तर त्याचे चार निरनिराळे प्रकार होताय. रेफ (रफारचिन्ह), पापणीच्या केसासारखी आडवी रेष (हे दोन प्रकार र + व्यंजन या जोडणीसाठी), अक्षराच्या पोटात जाणारी लहानशी तिरकी रेष आणि अक्षराच्या पायथ्याशी जोडला जाणारा लहानसा त्रिकोण (विनाशेंडीच्या काकपदचिन्हासारखा) (हे दोन प्रकार व्यंजन + र या जोडणीसाठी). कोणत्या अक्षराला आणि उच्चाराला कोणता र वापरायचा हे ठरलेलं आहे.
...रवर आघात देऊन उच्चार होणार असेल तर रेफ. सूर्य. गर्भ. अर्ज. अर्हता.
...रच्या नंतर य किंवा ह ही अक्षरं येणार असतील आणि रच्या उच्चारात आघात नसेल तर पापणीच्या केसासारखी रेघ. सुऱ्या. कुऱ्हाड. ऱ्हास.
...अक्षरात आख्खा स्वरदंड असेल (क या अक्षरातली मधली उभी रेघ म्हणजे स्वरदंड. द या अक्षरात वरची छोटुकली उभी देठरेष म्हणजे स्वरदंड. तो असतोच. पण सगळीकडे उभाच्या उभा, आख्खा असतो असं मात्र नाही.) तेव्हा एक लहानशी तिरकी रेष, जी अक्षराच्या पोटात जाते. प्रकाश. नम्रता. व्रण. ब्र. स्रोत. सहस्र. (हॉय. इथे केवळ रकार आहे. त्रकार नव्हे! सहस्त्र आणि स्त्रोत चूक आहेत. शस्त्र मात्र बरोबर.)
...याला अपवाद दचा. स्वरदंड आख्खा नसूनही दची खालची शेपटी असल्यामुळे त्याला त्रिकोण न जोडता रेषच जोडली जाते. द्रुतगती.
...अक्षराला देठासारखा छोटुसा स्वरदंड असेल तेव्हा अक्षराच्या पायथ्याशी लहानसा त्रिकोण जोडला जातो. ड्रम. ट्रम्प.
- र आणि ऋ यांच्यात घोटाळा करायचा नाही. अक्षराच्या पायथ्याशी येणाऱ्या लहानश्या वाटीसारखं चिन्ह हे ऋकाराचं. कृष्ण. पृष्ठ. मृत. आकृती.
- श हे अक्षरही थोडं घोळू आहे. श्र या अक्षरात खालची जी लहानशी तिरकी रेष आहे, तो र आहे आणि ती काढल्यावर जे उरतं ते श या अक्षराचंच रूप. (म्हणूनच विश्वास लिहिताना शचं रूप बदलूनही लिहिता येतं!) श्री = श् + र + ई. शृंगारात ऋकार आहे, रकार नाही. त्यामुळे श्र काढून त्याला खाली अर्धी वाटी जोडायचा आगाऊपणा करायचा नाही.
- त या अक्षराच्या पोटात तिरकी रेष दिली की त्र होतो. त् + र = त्र. य नाकातून म्हटला की जो उच्चार होतो, तो ञ. त्र निराळा आणि ञ निराळा. ञ हे च-छ-ज-झ-ञ या मालेतलं अनुनासिक अक्षर. (अवांतर: ञ हे अक्षर अर्ध्या जला जोडलं की ज्ञ मिळतो. ज् + ञ = ज्ञ. पण आपण ज्ञचा उच्चार जवळपास द् + न् + य असा माणसाळवला आहे! मूळ उच्चारही साधारण जवळपासचा आहे. करून पाहा.) (ञ-मॅन मला 'ञाही - अर्र - त्राही भगवान' करून सोडणार आहे या कानपिचकीबद्दल. पण क्या करें!)
वर्णमालेबद्दल पुन्हा कधीतर्री.  
तळटीप :
फेसबुकावर पूर्वप्रकाशित असलेल्या या टिपणाचा दुवा.

2 comments:

  1. खूपच छान. बऱ्याच वेळा पटकन आठवत नाहीत शुध्दलेखनाचे नियम. मराठी लिहीणे खूपच कमी झालय नं.

    ReplyDelete
    Replies
    1. ते इथे पाहत जा - https://mr.m.wikipedia.org/wiki/शुद्धलेखनाचे_नियम

      Delete