Showing posts with label #व्याकरण. Show all posts
Showing posts with label #व्याकरण. Show all posts

Tuesday, 9 June 2020

व्याकरण वजा संज्ञा : विभक्तिप्रत्यय आणि सामान्यरूप

संस्कृत भासणार्‍या लांबलचक नि जोडाक्षरयुक्त शब्दांबद्दल एक सर्वसाधारण राग असतो. त्याचा फटका व्याकरणातल्या संज्ञांनाही बसत असावा. त्यामुळे लोक व्याकरणाबद्दल अधिकाधिक असहिष्णूपणे वागत असणार. संज्ञांचे स्वतःचे फायदे असतात हे मान्य असलं, तरी त्यात पाय अडकून पडायला होऊ नये, म्हणून व्याकरणातल्या संज्ञांबद्दल थोडी मूलभूत स्पष्टीकरणं द्यायचा विचार आहे. आज नंबर चा-ची-चेचा.
~
वाक्यातल्या सगळ्या शब्दांचं त्या-त्या वाक्यापुरतं नेमून दिलेलं एक काम असतं.
उदाहरणादाखल पुढची वाक्यं एकेक करून वाचून पाहा.

बाळू चिंगी मारले.
चिंगी बाळू मारले.
चिंगीने बाळूला मारले.
बाळूने चिंगीला मारले.

पहिल्या दोन वाक्यांत कुणीतरी कुणालातरी मारलं इतकं कळतं. पण नक्की मार देणारा कोण नि खाणारा कोण हे कळत नाही. नंतरच्या दोन वाक्यांत मात्र ते नीटच कळतं. ते कशामुळे कळतं?
ने आणि ला या दोन अक्षरांमुळे कळतं.
या अक्षरांना स्वतःचा असा स्वतंत्र अर्थ नाही. पण एखाद्या शब्दापुढे ती अक्षरं आली, की आपोआप तो शब्द नक्की काय काम करतो आहे, हे पटकन कळतं. अशा, स्वतंत्र अर्थ नसलेल्या, पण दुसर्‍या शब्दाला जोडल्यावर एकाएकी अर्थात भर घालणार्‍या शब्दांना म्हणा, किंवा अक्षरांना म्हणा, प्रत्यय म्हणतात. मराठी भाषेत अशी चिकार मंडळी आहेत.

मला. बाबांना. काकूस. नदीला. मास्तरांनी. वेड्याने. प्रियकराशी. त्याचा. नटीची. लोकांचे. गाढवांच्या. जावेहून. घरून. शाळेत. गावी. मुलांनो.

या स-ग-ळ्या शब्दांमध्ये एक शब्द आणि त्याला जोडलेली एक शेपटी आहे. या वेगळ्या केलेल्या शेपट्या उर्फ प्रत्यय खाली दिलेल्या यादीत सापडतील.

म-ला. बाबां-ना. काकू-स. नदी-ला. मास्तरां-नी. वेड्या-ने. प्रियकरा-शी. त्या-चा. नटी-ची. लोकां-चे. गाढवां-च्या. जावे-हून. घर-ऊन. शाळे-त. गाव-ई. मुलां-नो.

ही फोड नीट पाहिली, तर आणखीही एक मजेशीर गोष्ट लक्ष्यात येईल. प्रत्यय वेगळे केले, की मूळ शब्द मिळायला हवा. पण तो कायमच मिळतो असं नाही. काकूस = काकू + स. या उदाहरणात काकू स्वतंत्र होताना जशीच्या तशी उरली. पण प्रियकराशी = प्रियकरा + शी या उदाहरणात मात्र प्रियकर वेगळा होताना त्याला एक काना लागून त्याचं प्रियकरा असं रूप तयार झालं.
मराठीतल्या बहुतांश शब्दांची, प्रत्यय लागल्यावर अशी थोडी वेगळी रूपं तयार होतात, असं लक्ष्यात येईल. या रूपांना सामान्यरूप असं म्हणतात. प्रत्ययाची शेपटी चिकटवून घेताना काही शब्दांचं होणारं हे रूपांतर ही मराठी भाषेची खासियत आहे. परकीय शब्दांचं मराठीकरण करून घेताना आपण बेमालूमपणे हे करत असतो. टेबल हा वास्तविक इंग्रजी शब्द. पण ‘चढ की त्या टेबलावर‍!’ असं सांगताना आपण टेबल या शब्दाचं टेबला असं रूपांतर नकळत करतो. ‘डॉक्टरांना किती मोठा धोका आहे सध्या!’ या वाक्यात डॉक्टर या इंग्रजी शब्दाचं डॉक्टरां असं रूपांतर करतो. मराठीचा साज परकीय शब्दांना घालून त्यांना आपलंसं केल्याची ही खूणच. किती मस्त लकब आहे ना भाषेची?
प्रत्ययांचे निरनिराळे प्रकार असतात. आपण वर पाहिला तो 'विभक्तिप्रत्यय' हा त्यांतला एक. तसंच प्रत्यय नसलेल्या आणखीही काही शेपट्या मराठीत अगदी सररास वापरतात. त्याबद्दल पुढच्या वेळी...

Saturday, 5 May 2018

परश्या आणि आर्ची यांची अभेद्य जोडी : अर्थात शब्दयोगी अव्ययं कशी लिहावीत!

परश्या ला भेटण्या साठी पार आपल्या घरा पासून शेता पर्यंत चालत जायला देखील आर्ची कमी करत नाही. तिच्या ने धीर च धरवत नाही. त्या साठी हवी तरी प्रिन्स ची बाईक सुद्धा लंपास करते ती कधी-कधी. तिच्या असल्या बिनधास्त वागण्या मुळे च परश्या तिच्या वर फिदा आहे. तिच्या कडे प्रेमा नं हसून बघण्या शिवाय तो दुसरं करणार तरी काय?

परश्याला भेटण्यासाठी पार आपल्या घरापासून शेतापर्यंत चालत जायलादेखील आर्ची कमी करत नाही. तिच्याने धीरच धरवत नाही. त्यासाठी हवी तरी प्रिन्सची बाईकसुद्धा लंपास करते ती कधी-कधी. तिच्या असल्या बिनधास्त वागण्यामुळेच परश्या तिच्यावर फिदा आहे. तिच्याकडे प्रेमानं हसून बघण्याशिवाय तो दुसरं करणार तरी काय?

यांपैकी कोणतं लेखन बरोबर आहे?
अर्थातच दुसरं.
पण विशेषकरून इंटरनेट आणि मोबाईलफोनवर वापरल्या जाण्यार्‍या मराठीत पहिल्या प्रकारची अनंत वाक्यं सापडतात आणि वाचणार्‍यालाही त्यात काही खटकत नाही. अलीकडे विभक्तिप्रत्यय आणि शब्दयोगी अव्ययं शब्दापासून तोडून लिहिण्याची एक फ्याशनच बोकाळलेली दिसते. तिचा उगम नक्की कुठे आहे, ते सांगणं कठीण. हिंदीत, इंग्रजीत, निरनिराळ्या कळपाटांनी दिलेल्या पर्यायांमध्ये की निव्वळ निष्काळजीपणात.... हे सांगणं कठीण. पण भले-भले लोकही ही चूक करताना दिसताहेत.
शब्दयोगी अव्ययं आणि विभक्तिप्रत्यय नामा-सर्वनामांना जोडून लिहिणं आणि ते जोडण्यासाठी त्या-त्या नामांचं सामान्यरूप तयार होणं हे मराठी भाषेचं वैशिष्ट्य आहे. मुदलात या दोन्ही घटकांच्या नावातच त्यांच्या लेखनाचा स्पष्ट निर्देश आहे. शब्दयोगी म्हणजे शब्दाला जोडून. विभक्तिप्रत्यय या शब्दामधल्या प्रत्यय या घटकाचा अर्थ आहे शब्दाला लागलेलं शेपूट. अर्थात शब्दाला जोडूनच त्याचं लेखन होतं. ही शेपटं शब्दाला जोडण्यापूर्वी त्या-त्या शब्दामध्ये अनेकदा (नेहमी नाही, सगळ्याच नामांमध्येही नाही) काहीतरी बदल होतो. उदाहरणार्थ – तिच्या बहिणीचं त्याच्या भावावर प्रेम आहे. मूळ नाम बहीण. सामान्यरूप बहिणी. मग त्याला षष्ठीचा प्रत्यय (चं) लागला. बहिणीचं. किंवा मूळ नाम भाऊ. सामान्यरूप भावा. त्याला शब्दयोगी अव्यय (वर) चिकटलं. भावावर.
ही अजून काही उदाहरणं -
भेटणे -> सामान्यरूप – भेटण्या -> + शब्दयोगी अव्यय – साठी -> भेटण्यासाठी
ती – सामान्यरूप – ति -> + विभक्तिप्रत्यय – च्या -> तिच्या
- विभक्तिप्रत्यय लागलेल्या शब्दापुढेदेखील शब्दयोगी अव्यय येऊ शकतं. (ती (ति) + च्या + साठी -> तिच्यासाठी)
- नामाला लागलेल्या एका शब्दयोगी अव्ययापुढेच दुसरंही शब्दयोगी अव्यय जोडलं जाऊ शकतं. (वागणे (वागण्या) + मुळे + च -> वागण्यामुळेच)
- एकाच नामाला दोन विभक्तिप्रत्ययही लागू शकतात. (ति + च्या + ने -> तिच्याने)

मराठीतली शुद्ध शब्दयोगी अव्ययं खालीलप्रमाणे. (अजूनही हीS भली मोठी यादी आहेच. पण ती द्यायची म्हणजे एक लहानशी पुस्तिकाच लिहावी लागेल.) ही फक्त आणि फक्त शब्दयोगी अव्ययंच आहेत. त्यांच्यामागे नामाचा वा सर्वनामाचा डबा जोडल्याखेरीज त्यांना काहीही अर्थ नाही.
ऐवजी, 
कडे, 
च, 
देखील, 
पर्यंत, 
पासून, 
प्रमाणे, 
मुळे, 
साठी, 
सुद्धा
मराठीमधले विभक्तिप्रत्यय सोबत जोडत आहे. (त्यांपैकी बरेचसे केवळ काव्यात – तेही जुन्या – उरले आहेत. ती यादी अपडेटवायला हवी आहे. झालंच, तर कारक आणि विभक्ती हा घोळही धड सोडवायला हवा आहे. पण ते फिर कभी!)
तेवढी फुकटची तोडफोड टाळा बुवा!

---
भाषा आपली सर्वांचीच आहे. उच्चारांत तर वैविध्य असतंच. मात्र निदान प्रमाणभाषेच्या लेखनात ते असू नये, ही अपेक्षा आपल्याच सोयीसाठी आहे. त्यासाठी केलेले नियम आणि संकेतही आपल्याच सोयीसाठी आहेत. ते बदलून हवे असतील तर त्यासाठी दबाव आणावा लागेल. ॲप्ससारख्या सोयी अधिक सुखकर हव्या असतील, तरीही आपल्याला सजग राहावं लागेल. आणि त्यासाठी मुदलात आपल्या प्रमाणभाषेचे नियम माहीत तरी करून घ्यावे लागतील. ॲप बदला, नियम बदला, संवाद झाल्याशी कारण... म्हणून नियम उधळून लावणं
ह्या सगळ्या सबबी आहेत. आपल्याच भाषेला हिंदी वा इंग्रजीची बटीक करणाऱ्या. तरीही त्या वापरण्याचं स्वातंत्र्य आहेच. कसलीही जबरदस्ती नाही. 

तळटीप :
फेसबुकावर प्रकाशित झालेल्या टिपणाचा हा दुवा.

'आपण' यांना पाहिलंत का?

मराठीत दोन प्रकारची अनेकवचनी प्रथमपुरुषी सर्वनामं आहेत. आम्ही आणि आपण. इंग्रजीत त्यांचं वर्णन exclusive we नि inclusive we असं करतात. हे मला माहीत होतं. पण त्याचं अधिक चपखल वर्णन मराठीतूनच करायचा प्रयत्न करत होते. ते काहीसं असं झालं :

आम्ही :
1) बोलणारी व्यक्ती स्वतःला एखाद्या गटाचा एक भाग मानते आहे.
2) ती व्यक्ती ज्याच्याशी वा ज्यांच्याशी बोलते आहे, त्याला वा त्यांना ती आपल्या गटाचा एक भाग मानत नाही.
3) अशी व्यक्ती आपल्या गटाबद्दल त्या दुसर्‍या व्यक्तीशी वा व्यक्तींशी बोलताना स्वतःच्या गटाला उद्देशून 'आम्ही' हे सर्वनाम वापरते.
4) या संभाषणात प्रथमपुरुषी सर्वनाम अनेकवचनी आहे. ते म्हणजे 'आम्ही'. द्वितीयपुरुषी सर्वनाम 'तू' किंवा 'तुम्ही' आहे. आम्ही आणि तू / तुम्ही हे दोन गट इथे स्पष्ट विभागलेले आहेत. त्या दोन गटांमध्ये निदान या वाक्यापुरता तरी कोणताही सामायिक भाग (overlapping section) नाही.

आपण :
1) बोलणारी व्यक्ती स्वतःला एखाद्या गटाचा भाग मानते आहे.
2) ती व्यक्ती ज्याच्याशी वा ज्यांच्याशी बोलते आहे, त्याला वा त्यांनाही ती आपल्या गटाचा एक भागच मानते.
3) अशी व्यक्ती आपल्या गटाबद्दल त्या दुसर्‍या व्यक्तीशी वा व्यक्तींशी बोलते आहे.
4) दुसरी व्यक्ती वा दुसर्‍या व्यक्तीही बोलणार्‍या व्यक्तीच्या गटातच मोडत असल्यामुळे, बोलण्याचे स्वरूप हे असं आहे  : गटातील व्यक्ती-गटाबद्दल-गटातील व्यक्तीशी -> गट-गटागटाबद्दल-गटाशी. 
5) या संभाषणात प्रथमपुरुषी सर्वनाम अनेकवचनी आहे. ते म्हणजे 'आपण'. द्वितीयपुरुषी सर्वनाम कोणतं आहे इथे? तेही 'आपण'च! बोलणारी व्यक्ती आणि ऐकणारी व्यक्ती वा ऐकणार्‍या व्यक्ती या दोन गटांमध्ये इथे स्पष्ट विभाजन नाही. जणू मी माझ्याशीच माझ्याबद्दलच बोलते आहे असा भाव. कारण या दोन गटांमध्ये स्वच्छ जाणवणारा सामायिक भाग (overlapping section) आहे.

तर - असं आपलं आपल्यापाशीच (!) समजून घेताना, मला साक्षात्कार झाला की आपण हे सर्वनाम फक्त प्रथमपुरुषी नाही, ते द्वितीयपुरुषीही आहे!

आता हे तपासून पाहणं आलं. यासाठी लगोलग दोन सोप्या चाचण्या आठवल्या. प्रथमपुरुषी आणि द्वितीयपुरुषी सर्वनामाच्या व्याख्येची एक. आणि आज्ञार्थाची दुसरी.

वक्ता किंवा लेखक स्वतःकडेच निर्देश करण्यासाठी ज्या सर्वनामाचा उपयोग करतो ते प्रथमपुरुषी. या निकषानुसार आपण हे सर्वनाम प्रथमपुरुषी झालं. (आपण [सगळे] जेवायला जाऊ या का? -> 'आपण'मध्ये बोलणारी व्यक्तीही गृहीत आहे.) ज्याच्याशी वक्ता बोलतो किंवा ज्याच्यासाठी लेखक लिहितो, त्याला उद्देशून असलेलं सर्वनाम ते द्वितीयपुरुषी. या निकषानुसार आपण हे सर्वनाम द्वितीयपुरुषीही झालं. (आपण [सगळे] जेवायला जाऊ या का? -> 'आपण'मध्ये ज्याच्याशी वा ज्यांच्याशी बोललं जातं आहे, ती वा त्या व्यक्तीही आहेत.) म्हणजे ही चाचणी यशस्वी.

आज्ञार्थ किंवा ऊआख्यात ज्याला म्हणतात, त्यात द्वितीयपुरुषी आणि क्वचित प्रथमपुरुषी सर्वनामांना उद्देशून केलेलं बोलणं असतं. हे बोलणं सहसा आज्ञा, सौम्य आज्ञा, इच्छा आणि मग आज्ञा अशा प्रकारांत मोडतं. या निकषानुसार प्रथमपुरुषी आणि द्वितीयपुरुषी आज्ञार्थी वाक्यं तयार करून पाहिली.
1) आता हा पुढच्या पानावरचा तक्ता पाहा. (तू या द्वितीयपुरुषी सर्वनामाला उद्देशून)
2) हां पोरींनो, जपून. मध्ये हलका उतार आहे, अशा इकडून चला. (तुम्ही या द्वितीयपुरुषी अनेकवचनी सर्वनामाला उद्देशून)
3) पण श्री. फडके, असं काय करता, तुम्ही मला एकदा फोन नाही का करायचात? (तुम्ही या द्वितीयपुरुषी एकवचनी - आदरार्थी सर्वनामाला उद्देशून)
4) महाराज, आपण परवानगीसाठी थांबायची गरज नाही, चला. (आपण या द्वितीयपुरुषी एकवचनी अत्यादरार्थी (;-)) सर्वनामाला उद्देशून)
5) झालं लिहून? आण इकडे. पाहू बरं. (इथे 'आण' हे 'तू' या द्वितीयपुरुषी एकवचनी सर्वनामाला उद्देशून आहे, तर 'पाहू' हे नक्की कुणाला उद्देशून आहे, ते लगेच ठरवणं जड जातं. पण थोडा विचार केला की लक्ष्यात येतं, ते स्वतःला उद्देशून - अर्थात प्रथमपुरुषी सर्वनामाला उद्देशून आहे.)
6) असं करू, येत्या शनिवारी पहाटेच निघू, म्हणजे उन्हाच्या आत पोचता येईल. (इथे 'करू' आणि निघू' ही दोन्ही क्रियापदं बोलणार्‍या व्यक्तीलाही उद्देशून आहेत (प्रथमपुरुषी) आणि ज्यांच्याशी बोलणं होतं आहे, त्या व्यक्तीला वा व्यक्तींनाही (द्वितीयपुरुषी) उद्देशून आहेत. हे दोन्ही पुरुषांसाठी लागू असणारं अध्याहृत सर्वनाम आहे - आपण.) अर्थात, इथे असा वाद संभवू शकतो, की जरी 'आपण'मध्ये 'मी' आणि 'तुम्ही' हे दोन्हीही अंतर्भूत असलं, तरीही बोलणारी व्यक्ती स्वतःचा वाढीव भाग म्हणून या गटाचा निर्देश करते आहे, आणि त्यामुळे 'आपण'चं वर्गीकरण करताना ते प्रथमपुरुषात केलं पाहिजे. त्याचा प्रतिवाद असा : दोन्ही पुरुषांचा सहभागाबद्दल मतभेद तर नाहीच. मग कोणता पुरुष प्रबळ 'भासतो' ते ठरवून दुसर्‍या पुरुषाची हकालपट्टी का करावी? दोन्ही पुरुषांचा अंतर्भाव 'inclusive आपण'मध्ये आहे, असं का म्हणू नये?

इथे साक्षात मोरो केशवांची साक्ष काढावी म्हणून 'शास्त्रीय मराठी व्याकरण' उघडलं, तर ते म्हणत होते - स्वतः आणि आपण या दोन सर्वनामांना स्वतःचा पुरुष असा नाहीच.

स्वतः हे कायम कोणत्या ना कोणत्या सर्वनामाला लागून येतं आणि त्या सर्वनामाचा पुरुष धारण करतं. उदाहरणार्थ - मी स्वतः उठून रांधीन तेव्हा मुखी घास पडायचा! किंवा, त्यांनी स्वतःच मला तसं सांगितलं, खोटं कसं असेल? (तर हे बरोबरच. पण यावर विचार करताना मला आणिक एक उदाहरण सुचलं - आपण स्वतः मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही. आता इथे पुरुष कुठला हो धरायचा दामले आजोबा?!)

या सर्वनामांना पुरुष नाहीच असं म्हणणं जर तांत्रिकदृष्ट्या स्वीकार्य आहे, तर मग त्यांचं वर्गीकरण त्या-त्या सगळ्या पुरुषांत केलं म्हणून चुकलं कुठे?

खेरीज 'आपण'चे फक्त प्रथमपुरुषी एकवचनी (पक्या स्वतःशी विचार करू लागला, आपण इतकं केलं टवळीसाठी, तरी ही बेवफा ती बेवफाच!), प्रथमपुरुषी अनेकवचनी ("होय की, आपण मर मर मरावं, तेव्हा कुठे मालकाचं समाधान होणार..." लक्ष्मीचं म्हणणं त्या सगळ्यांच्याच मनात घर करून होतं.), द्वितीयपुरुषी अत्यादरार्थी एकवचनी वा अनेकवचनी ("राजे, आपण आमच्या घरी आलात, आम्ही धन्य झालो!") उपयोग आहेतच.

चिटवळपणा करायचा, तर 'आपण'चा खोचक आदरार्थी वापर (मधोबा, आपण 'शहाणे' आहात झालं. निघा!) आहेच. पण तो द्वितीयपुरुषीच म्हणायचा.

झालंच, तर 'खुद्द' या शब्दाचा विचार दामल्यांनी केलेला दिसत नाही. संस्कृतकेंद्री विचार करण्याच्या पद्धतीचा तो परिणाम असावा. पण 'खुद्द' हेही एक 'स्वतः'ला समांतर असं सर्वनाम आहेच. तेही मुख्य सर्वनामाला जोडूनच येतं. फक्त त्याची जागा मुख्य सर्वनामाच्या आधी आलेली दिसते. उदाहरणार्थ,

- तिनं स्वतः उठून पाणी शेंदलं.
- खुद्द ती उठली, तेव्हा कुठे काम झालं.

पुढे-मागे यात या 'खुद्द'चीही (आणि 'दस्तुरखुद्द'चीही) जिरवणी करणे आहे, ही नोंद. 

अखेरीस तक्ता केला, तो काहीसा असा :

काही चूकभूल दिसत असेल तर सांगा. सुधारणा करता येईल. बाकी या निमित्तानं लक्ष्यात आलेली गोष्ट, मोरो केशव दामले आजोबांच्या 'शास्त्रीय मराठी व्याकरणा'चं काळानुरूप पुनर्लेखन कुणीतरी करायला हवं आहे.

टिपा :

1. ए सेन मॅन आणि धनंजय यांच्याशी झालेल्या चर्चेमुळे या टिपणात मोलाची भर पडली आहे. दोघांचेही आभार.
2. या सर्वनामांमध्ये प्रश्नार्थक सर्वनामांचा विचार केलेला नाही. तो स्वतंत्रपणेच केलेला सोयीचा जाईल.
3. मोरो केशव दामले यांचा 'शास्त्रीय मराठी व्याकरण' हा ग्रंथ इथे मिळेल.
4. हे टिपण फेसबुकावरही दोन आवृत्त्यांमध्ये प्रकाशित झालं होतं, त्याचे दुवे अ) आणि आ)