Friday 12 June 2020

शब्दांची जातिव्यवस्था : प्रकार पहिला

काही संज्ञा समजून घेतल्याशिवाय पुढे जाताना पावलोपावली अडखळायला होईल. म्हणून काही मूलभूत वर्गीकरणं आणि त्याला व्याकरणानं दिलेली नावं शिकून घेऊ.
शब्दांचेही प्रकार असतात. अगदी पाणबंद नसतात. एका प्रकारातला शब्द दुसर्‍याचं काम करू शकतो अधूनमधून गरजेनुसार. पण तरीही प्रकार राहतातच. या प्रकारांना शब्दांच्या जाती म्हणतात. त्यांतही पोटजाती असतात, पण त्यात तूर्त शिरायला नको. गरज पडेल तेव्हा बघता येईल.
१. नाम : कुठल्याही व्यक्तीला वा गटाला वा जागेला वा वस्तूला वा संकल्पनेला वा भावनेला वा गुणाला दिलेलं नाव. (उदा. मेघना, टेकडी बंगला, ठाणे, चाळेगत, पुस्तक, वापर, जागा, बाटली, यश, नैराश्य, चांगुलपणा, बक्षीस, उंदीर, चिंटू, घार.) मेघना किंवा चिंटू किंवा चाळेगत ही नामं आहेत हे चटकन स्वीकारलं जातं. पण नैराश्य किंवा बाटली ही नामं आहेत हे पचनी पडत नाही. समजा, आपण आदिमानव आहोत. अजून भाषा घडते आहे. एखाद्या संध्याकाळी एकदम रडू यायला लागलं, काही करू नये, गुहेत बसून राहावं असं वाटलं. आपल्याला काय होतंय, हे कुणाला सांगायचं म्हटलं. त्याला नाव द्यावं लागेल की नाही? त्या भावनेला दिलेलं नाव म्हणजे नैराश्य. तेच बाटलीचंही. ‘द गॉड्स मस्ट बी क्रेझी’सारख्या परिस्थितीत यापूर्वी कधीही न पाहिलेली काचेची बाटली समोर आली. त्या वस्तूला काहीतरी नाव द्यावंसं वाटलं. ते नाव म्हणजे ‘बाटली’ हे नाम.
२. सर्वनाम: नामाच्या ऐवजी वापरण्याचे शब्द (उदा. मी, आम्ही, तू, तुम्ही, तो, ती, ते, ते, त्या, आपण.) नाम पुन्हा पुन्हा वापरायचा कंटाळा आल्यामुळे किंवा येऊ नये म्हणून जे शब्द वापरतात, ती सर्वनामं. ती तीन प्रकारची असतात. स्वतःला उद्देशून वापरलेली, आपण ज्यांच्याशी बोलतो आहोत त्यांना उद्देशून वापरलेली, आणि आपण ज्यांच्याबद्दल वा ज्याबद्दल बोलतो आहोत त्यांना वा त्याला उद्देशून वापरलेली. मग ती एकवचनी असतील, अनेकवचनी असतील, व्यक्तीसाठी असतील, वस्तूसाठी वा भावनेसाठी वा गुणासाठी असतील, स्त्रीलिंगी-पुल्लिंगी-नपुंसकलिंगी असतील. या फरकांबरहूकूम त्यांच्यात पोटवर्गीकरणं नि तक्ते करता येतील. ते पुन्हा कधीतरी.
३. विशेषण: नाम वा सर्वनाम यांबद्दल वा त्यांच्या गुणांबद्दल अधिक माहिती देणारा शब्द म्हणजे विशेषण. (उदा. चांगली, उंच, गोरी, नकटी, वाह्यात, महाकाय, कसनुशी, लबाड, दुष्ट, समजूतदार, बारीक, अरुंद, आकर्षक, भरपूर, नेत्रदीपक, वेडसर, खट्याळ, संयमी.) विशेषण हे कायम कोणत्या ना कोणत्या, दृश्य वा अदृश्य नामासाठी वा सर्वनामासाठी असतं. त्या नामाचं वा सर्वनामाचं लिंग वा वचन बदललं की काही विशेषणांचं शेवटचं अक्षर बदलतं, काहींचं बदलत नाही. चांगलं स्थळ. चांगला शिरा. चांगली सासू. चांगली स्थळं. चांगले शिरे. चांगल्या सासवा. खट्याळ मूल. खट्याळ कविता. खट्याळ दीर. खट्याळ मुलं. खट्याळ कविता. खट्याळ दीर.
४. क्रियापद: वाक्यातली घटना वा कृती दर्शवणारा शब्द (उदा. होणे, असणे, करणे, वाटणे, लागणे, लिहिणे, वाचणे, झोपणे, जाणे, येणे, खाणे, पिणे, पोहणे, उडणे, बसणे, उठणे, मरणे, जगणे.) या सगळ्या उदाहरणांत शेवटचं अक्षर णे आहे. क्रियापदाचं मूळ रूप असंच णे या अक्षरानं संपवतात. ते काढलं, की जो उरतो, तो त्या क्रियापदाचा धातू. एखादी क्रिया करायची आज्ञा एका लहान मुलाला देऊन पाहा. जे मिळेल तो धातू असेल. ऊठ. पळ. धाव. ऊड. चीड. पड. खा. जा. ये. नीघ. मर. इत्यादी. क्रियापद क्रिया सांगतंय की घटना सांगतंय की अजून काही सांगतंय (होय, अशीही क्रियापदं आहेत!), यावरून त्यांची चाल ठरते. हा भलताच मोठ्ठा विषय आहे. पण कोणत्याही वाक्यात दिसणारं वा न दिसणारं एकतरी क्रियापद असतंच, इतकं लक्ष्यात ठेवणं पुरे.
या चारही जातींचे शब्द वापर करताना 'जस्सेच्या तस्से’ राहत नाहीत. म्हणजे कोशात बघायला गेलात, तर ते त्यांच्या मूळ रूपांत मिळतील. पण वाक्यांमध्ये मात्र त्यांच्या शेपट्या हा-हा म्हणता बदलतात. त्यांना प्रत्यय लागतात. त्यांची सामान्यरूपं होतात. ते ‘चालता-चालता’ मुखडा बदलतात. उरलेल्या चार जातींचे शब्द मात्र काही केल्या बदलत नाहीत. त्यांना विकार उर्फ ‘व्यय’ नाही. म्हणून ती अव्ययं.
५. शब्दयोगी अव्यय : काळवेळ, क्रम, जवळीक, स्थान, कारण, निमित्त, उद्देश, रीत, अभाव, सोबत, अपवाद... अशा अनेक गोष्टी सांगण्याकरता प्रत्ययांसारख्याच, पण प्रत्ययांपेक्षा थोड्या मोठ्या शेपट्या नामांना वा सर्वनामांना जोडायची पद्धत आहे. उदाहरणं पाहिलीत की हे कळेल. लग्नापूर्वी (क्रम), आईजवळ (निकटता), टेबलावर (स्थान), परीक्षेमुळे (कारण), स्वयंपाकासाठी (उद्देश), मैत्रिणीविना (अभाव), वडिलांखेरीज (अपवाद). या सगळ्या उदाहरणांत शब्दाचं सामान्यरूप होऊन त्यांना पूर्वी, जवळ, वर, मुळे, साठी, विना, खेरीज… अशा एरवी अर्थहीन असलेल्या शेपट्या लागलेल्या दिसतील. या शेपट्या कायम शब्दांना जोडून लिहितात (शब्द-योग) आणि त्यांच्यात काहीही बदल होत नाही (अ-व्यय). म्हणून ती शब्दयोगी अव्ययं.
६. उभयान्वयी अव्यय : कुठलेही दोन वा अधिक स्वतंत्र शब्द वा वाक्यं तात्पुरती जवळ आणायची असली, की उभयान्वयी अव्यय वापरतात. दोन शब्द (आई व बाबा) असू देत वा दोन वाक्यं (मी निघालो आणि तेवढ्यात ती आली. पाऊस पडला, पण पाण्याचा तुटवडा आहेच. तू येतोस, की मी जाऊ?) असू देत. कारण देणे, परिणाम सांगणे, पर्याय देणे, विसंगती नोंदवणे, संगती सांगणे… अशी अनेक कामं ही उभयान्वयी अव्ययं करतात. उभय म्हणजे दोन्ही. अन्वय म्हणजे संबंध. दोन गोष्टींतला संबंध सांगणारे न बदलणारे शब्द म्हणजे उभयान्वयी अव्ययं.
७. क्रियाविशेषण अव्यय : विशेषणं जशी नाम वा सर्वनाम यांबद्दल अधिकची माहिती देतात, तशी क्रियाविशेषणं ही क्रियापदाबद्दल अधिकची माहिती देतात. उदा. मी धाडदिशी आपटले. आपटण्याची क्रिया कशी झाली? धाडदिशी. म्हणून ते क्रियाविशेषण. चल, चल, आटप लवकर. कसं आटप? लवकर आटप. म्हणून लवकर हे क्रियाविशेषण. एक गुगली प्रकार म्हणजे, कधीकधी काही शब्दयोगी अव्ययंही क्रियाविशेषणांचे कपडे घालून येतात. उदा. पूर्वी असं होत नसे. कधी होत नसे? पूर्वी. झालं शब्दयोगी अव्ययाचं क्रियाविशेषण. याही शब्दांच्या कानामात्रेत काडीमात्र बदल होत नाही. त्यामुळे हीसुद्धा अव्ययंच.
८. केवलप्रयोगी अव्यय : मानवी भावभावना दर्शवणारे, तोंडून अभावितपणे बाहेर पडणार्‍या उद्गारांसारखे जे शब्द असतात, ती केवलप्रयोगी अव्ययं. उदा. अरेच्चा! आज इकडे कुठे? च्यायला! राडाच झाला की. बाबौ! काय हा पाऊस म्हणायचा की काय! हट! मी अजिबात येणार नाही, तुला हवं तर तू ये. अरेरे! काय ही अवस्था तुमची. ओळखता आली केवलप्रयोगी अव्ययं? अरेच्चा, च्यायला, बाबौ, हट, अरेरे. ही सगळी केवलप्रयोगी अव्ययं. ही बहुतेकदा उद्गारचिन्हांच्या पूर्वी येतात. पण म्हणून उद्गारचिन्ह कायम साथीला असेलच असं मात्र नाही. त्याशिवायही केवलप्रयोगी अव्ययं लिहिली जातात.
तर - या शब्दांच्या जाती. स-ग-ळे शब्द या जातींपैकी कुठल्या ना कुठल्या जातीत बसवता येतात. वाक्यात आल्यावर मात्र त्यांना कसली ना कसली भूमिका बजावायची असते. त्या भूमिकांचंही एक वर्गीकरण आहेच. त्याबद्दल पुढच्या वेळी.

No comments:

Post a Comment