Tuesday 9 June 2020

व्याकरण वजा संज्ञा : विभक्तिप्रत्यय आणि सामान्यरूप

संस्कृत भासणार्‍या लांबलचक नि जोडाक्षरयुक्त शब्दांबद्दल एक सर्वसाधारण राग असतो. त्याचा फटका व्याकरणातल्या संज्ञांनाही बसत असावा. त्यामुळे लोक व्याकरणाबद्दल अधिकाधिक असहिष्णूपणे वागत असणार. संज्ञांचे स्वतःचे फायदे असतात हे मान्य असलं, तरी त्यात पाय अडकून पडायला होऊ नये, म्हणून व्याकरणातल्या संज्ञांबद्दल थोडी मूलभूत स्पष्टीकरणं द्यायचा विचार आहे. आज नंबर चा-ची-चेचा.
~
वाक्यातल्या सगळ्या शब्दांचं त्या-त्या वाक्यापुरतं नेमून दिलेलं एक काम असतं.
उदाहरणादाखल पुढची वाक्यं एकेक करून वाचून पाहा.

बाळू चिंगी मारले.
चिंगी बाळू मारले.
चिंगीने बाळूला मारले.
बाळूने चिंगीला मारले.

पहिल्या दोन वाक्यांत कुणीतरी कुणालातरी मारलं इतकं कळतं. पण नक्की मार देणारा कोण नि खाणारा कोण हे कळत नाही. नंतरच्या दोन वाक्यांत मात्र ते नीटच कळतं. ते कशामुळे कळतं?
ने आणि ला या दोन अक्षरांमुळे कळतं.
या अक्षरांना स्वतःचा असा स्वतंत्र अर्थ नाही. पण एखाद्या शब्दापुढे ती अक्षरं आली, की आपोआप तो शब्द नक्की काय काम करतो आहे, हे पटकन कळतं. अशा, स्वतंत्र अर्थ नसलेल्या, पण दुसर्‍या शब्दाला जोडल्यावर एकाएकी अर्थात भर घालणार्‍या शब्दांना म्हणा, किंवा अक्षरांना म्हणा, प्रत्यय म्हणतात. मराठी भाषेत अशी चिकार मंडळी आहेत.

मला. बाबांना. काकूस. नदीला. मास्तरांनी. वेड्याने. प्रियकराशी. त्याचा. नटीची. लोकांचे. गाढवांच्या. जावेहून. घरून. शाळेत. गावी. मुलांनो.

या स-ग-ळ्या शब्दांमध्ये एक शब्द आणि त्याला जोडलेली एक शेपटी आहे. या वेगळ्या केलेल्या शेपट्या उर्फ प्रत्यय खाली दिलेल्या यादीत सापडतील.

म-ला. बाबां-ना. काकू-स. नदी-ला. मास्तरां-नी. वेड्या-ने. प्रियकरा-शी. त्या-चा. नटी-ची. लोकां-चे. गाढवां-च्या. जावे-हून. घर-ऊन. शाळे-त. गाव-ई. मुलां-नो.

ही फोड नीट पाहिली, तर आणखीही एक मजेशीर गोष्ट लक्ष्यात येईल. प्रत्यय वेगळे केले, की मूळ शब्द मिळायला हवा. पण तो कायमच मिळतो असं नाही. काकूस = काकू + स. या उदाहरणात काकू स्वतंत्र होताना जशीच्या तशी उरली. पण प्रियकराशी = प्रियकरा + शी या उदाहरणात मात्र प्रियकर वेगळा होताना त्याला एक काना लागून त्याचं प्रियकरा असं रूप तयार झालं.
मराठीतल्या बहुतांश शब्दांची, प्रत्यय लागल्यावर अशी थोडी वेगळी रूपं तयार होतात, असं लक्ष्यात येईल. या रूपांना सामान्यरूप असं म्हणतात. प्रत्ययाची शेपटी चिकटवून घेताना काही शब्दांचं होणारं हे रूपांतर ही मराठी भाषेची खासियत आहे. परकीय शब्दांचं मराठीकरण करून घेताना आपण बेमालूमपणे हे करत असतो. टेबल हा वास्तविक इंग्रजी शब्द. पण ‘चढ की त्या टेबलावर‍!’ असं सांगताना आपण टेबल या शब्दाचं टेबला असं रूपांतर नकळत करतो. ‘डॉक्टरांना किती मोठा धोका आहे सध्या!’ या वाक्यात डॉक्टर या इंग्रजी शब्दाचं डॉक्टरां असं रूपांतर करतो. मराठीचा साज परकीय शब्दांना घालून त्यांना आपलंसं केल्याची ही खूणच. किती मस्त लकब आहे ना भाषेची?
प्रत्ययांचे निरनिराळे प्रकार असतात. आपण वर पाहिला तो 'विभक्तिप्रत्यय' हा त्यांतला एक. तसंच प्रत्यय नसलेल्या आणखीही काही शेपट्या मराठीत अगदी सररास वापरतात. त्याबद्दल पुढच्या वेळी...

No comments:

Post a Comment